पालिकेतही घराणेशाही

By admin | Published: October 31, 2016 01:34 AM2016-10-31T01:34:38+5:302016-10-31T01:34:38+5:30

आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी आपल्या निकटवर्तीयांना निवडणुकीत उतरविण्याची तयारी केली आहे.

Domestication in the corporation | पालिकेतही घराणेशाही

पालिकेतही घराणेशाही

Next


पिंपरी : महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून, आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी आपल्या निकटवर्तीयांना निवडणुकीत उतरविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या महापालिका निवडणुकीत घराणेशाही येणार याचे संकेत मिळू लागले आहेत.
फेब्रुवारी २०१७च्या महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. आरक्षण सोडत, प्रभागरचना, प्रारूप आराखडा जाहीर झाला आहे. पक्षीय पातळीवर तयारी सुरू आहे. आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी स्वत:सह पत्नी, मुलगा, मुलगी अथवा पुतण्या यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. सलग चार टर्म नगरसेवकपद उपभोगले. वय झाले. आता खांदेपालट करणे आवश्यक आहे, असे ज्यांना वाटते त्यांनी त्यांच्या प्रभागात आपल्या वारसाला रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. प्रभाग महिलांसाठी राखीव झाला म्हणून पत्नीला रिंगणात उतरविण्याची तयारी ठेवली आहे. पक्ष कोणताही असो, वर्षानुवर्षे सतरंज्या उचलण्यापर्यंतचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कोणालाच कदर नाही, हे या निमित्ताने प्रकर्षाने जाणवत आहे. आरक्षण बदलले, तर त्या ठिकाणी एखाद्या सच्च्या कार्यकर्त्याला संधी द्यावी, हा विचार मागे पडला आहे.
व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक या सोशल मीडियावर, तसेच शुभेच्छाफलकांवर घराणेशाहीचे चित्र उमटू लागले आहे. नगरसेवक, आमदार ते खासदारकीपर्यंत मजल मारलेल्या गजानन बाबर यांचे चिरंजीव सूरज, माजी नरगसेवक मधुकर बाबर यांचे चिरंजीव योगेश, माजी नगरसेवक प्रकाश बाबर, तसेच विद्यमान नगरसेविका शारदा बाबर यांचे चिरंजीव अमित यांची कोणत्या प्रभागातून निवडणूक लढता येईल, याची चाचपणी सुरू आहे.
माजी महापौर मंगला कदम यांचे चिरंजीव कुशाग्र हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहेत. माजी आमदार विलास
लांडे, तसेच माजी महापौर मोहिनी लांडे यांचे चिरंजीव विक्रांत यांचेही नाव चर्चेत आहे.
माजी महापौर आझम पानसरे यांनी चिरंजीव निहाल पानसरे, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर व नगरसेविका अनिता तापकीर यांनी चिरंजीव सागरला प्रमोट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नगरसेवक कैलास थोपटे यांचे चिरंजीव कुणालही नशीब आजमाविण्याच्या तयारीत आहेत. नगरसेविका चारुशिला कुटे या पुढील सूत्र चिरंजीव प्रमोद याच्या स्वाधीन करणार आहेत.
माजी नगरसेवकही त्यास अपवाद राहिलेले नाहीत. सूर्यकांत थोरात यांनी मुलगा ललित याच्यासाठी, तर नागेश अगज्ञान यांनी मुलगा प्रशांतसाठी फिल्डिंग लावली आहे. वसंत लोंढे यांचे चिरंजीव योगेश हेसुद्धा तयारीला लागले आहेत. राजू दुर्गे यांनी कन्या तेजस्विनी हिच्या माध्यमातून वारसा पुढे ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्यसभेवर खासदारकीची संधी मिळालेल्या अमर साबळे यांची कन्या वेणू साबळे यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत.
मुलगा, मुलगी अथवा अन्य नातेवाईक यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी स्वपक्षासह अन्य पक्षातही अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. प्रभाग अनुसूचित महिलासाठी राखीव झाल्याने गड आपल्या हातून जाऊ नये, या हेतूने नगरसेवक जितेंद्र
ननावरे, विनायक गायकवाड यांनी पत्नीला रिंगणात उतरविण्याचे निश्चित केले आहे. (प्रतिनिधी)
>पद आणि सत्तेच्या मोहापायी लोकशाही मूल्यांचे कोणालाच काही घेणे-देणे नसल्याचे वास्तव स्पष्ट होत आहे. ज्यांना महापालिका, विधानसभा, लोकसभेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, महापालिकेत विविध पदांवर काम करता आले, सलग तीन-चार टर्म नगरसेवक म्हणून संधी मिळाली, अशा व्यक्तींकडून लोकशाही मूल्यांच्या केवळ घोषणा होतात. निवडणूक येताच मात्र नात्या-गोत्याला महत्त्व दिले जाते. याचा प्रत्यय येत्या महापालिका निवडणुकीत येणार असून, सद्य:स्थितीत आजी, माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी पत्नी, चिरंजीव, पुतण्या यांना निवडणुकीत उतरविण्याची तयारी केली आहे.

Web Title: Domestication in the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.