वैद्यकीय प्रवेशात डोमिसाइल घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 05:40 AM2017-07-24T05:40:36+5:302017-07-24T05:40:36+5:30
स्थानिक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कोट्यातून वैद्यकीय प्रवेश मिळविण्यासाठी प्रत्यक्षात परराज्यांमधील असलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील १
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्थानिक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कोट्यातून वैद्यकीय प्रवेश मिळविण्यासाठी प्रत्यक्षात परराज्यांमधील असलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील १५ वर्षांच्या वास्तव्याचा बोगस ‘अधिवास दाखला’ (डोमिसाइल सर्टिर्फिकेट) सादर केल्याचे उघड झाल्याने, स्थानिक विद्यार्थी आणि पालक चिंतित झाले आहेत. महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेशांची पहिली यादी २५ जुलै रोजी प्रसिद्ध व्हायची आहे. त्यामुळे प्रशासनाने या फसवणुकीची त्या आधी संपूर्ण कसून चौकशी करून, एकही पात्र स्थानिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खात्री करावी, असा आग्रह विद्यार्थी व पालकांनी धरला आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता, पारदर्शकता यावी, म्हणून देश पातळीवर ‘नीट’ परीक्षा घेण्यात आली. मात्र, या प्रक्रियेतही विद्यार्थ्यांनी घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ८५ टक्के कोट्यात वर्णी लावण्यासाठी दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, गोवा, गुजरात इत्यादी राज्यांमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळ राज्याबरोबर महाराष्ट्रातूनही खोटा ‘अधिवास दाखला’ देऊन अर्ज भरल्याचे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने जाहीर केलेल्या यादीवरून स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शासकीय महाविद्यालयांत ३,५०० व शासकीय अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांत सुमारे दीड हजार जागा अशा तब्बल पाच हजार जागा उपलब्ध आहेत.
विद्यार्थी ज्या राज्याचा रहिवासी आहे, त्या राज्यातील ८५ टक्के कोट्यात तो अर्ज भरू शकतो. त्याचबरोबर, अन्य राज्यात त्याला प्रवेश घ्यायचा असल्यास, तो १५ टक्के ‘आॅल इंडिया’ कोट्यात अर्ज भरू शकतो.
प्रत्येक राज्याने विद्यार्थ्यांच्या नावाच्या याद्या संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत. या याद्यांची पडताळणी केल्यावर, महाराष्ट्रात अर्ज केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी दुसऱ्या राज्यांमध्येही अर्ज भरल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ‘नीट’ परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाचे दरवाजे देशभर खुले झाले असले, तरी त्याचाही लबाडीने दुरूपयोग केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या यादीतून जवळपास ४०० विद्यार्थ्यांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. कारण त्यांनी खोटी ‘डोमिसाइल सर्टिफिकेट’ दिल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही.
- डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय
कठोर तपासणीची पालकांची मागणी
देशात मेडिकलच्या सर्वाधिक जागा महाराष्ट्रात असल्याने, स्थानिकांच्या ८५ टक्के कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी इतर राज्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या राज्याबरोबरच महाराष्ट्राचा खोटा अधिवास दाखला घेऊन अर्ज भरल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
राज्यातून दहावी पास न झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांच्या कठोर तपासणीची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे.