Manoj Jarange Patil News: नाकारलेल्या परवानगीला मानत नाही, मी हटणार नाही; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 10:56 AM2024-06-08T10:56:47+5:302024-06-08T10:57:50+5:30

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली होती. परंतु उपोषणावर आपण ठाम असल्याचं त्यांनी आज स्पष्ट केलंय.

Don t accept permission denied I won t back down Manoj Jarange patil insists on hunger strike maratha reservation | Manoj Jarange Patil News: नाकारलेल्या परवानगीला मानत नाही, मी हटणार नाही; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

Manoj Jarange Patil News: नाकारलेल्या परवानगीला मानत नाही, मी हटणार नाही; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

Manoj Jarange Patil News: लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर राज्यातील राजकारणाला वेग येताना दिसत आहे. महाविकास आघाडीने ३० जागा जिंकत महायुतीला धक्का दिला. महायुतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले. यातच मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली होती. काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमधील ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध दर्शवला होता. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आपण मागे हटणार नसल्याचं म्हटलं आहे.
 

"आपण शांततेत आंदोलन करू शकता असा अधिकार घटनेनं जनतेला दिलेला आहे. त्यामुळे शांततेत आमरण उपोषण मी करतोय. मी घटनेला मानायला लागलो. कायदा चालवून घेणाऱ्यांना आता मी मानत नाही. जो कायदा चालवायला मराठ्यांनीच त्या पदावर बसवलंय, ते कायदा पायदळी तुडवायला लागलेत," असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. अंतरवाली सराटीत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.
 

"४ जूनला आचारसंहिता होती, मी त्याचा सन्मान केला. मी माझं आंदोलन ८ तारखेला पुढे ढकललं. पुन्हा पुन्हा नाकारणार असाल, तर मी तुम्ही नाकारलेल्या परवानगीला मानत नाही. कायद्याला मी मानतो आणि घटनेनं, कायद्यानं मला तो अधिकार दिलेला आहे. मी ८ जूनला सकाळी आमरण उपोषणाला बसणार आहे आणि मी मागे हटणार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
 

परवानगी नाकारली
 

मिळालेल्या माहितीनुसार, सगेसोयरे तरतुदीसह अन्य काही मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार होते. परंतु, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. तसंच उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेचे कोणतीही कागदपत्र सादर न केल्यामुळे जरांगे पाटील यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 
 

ग्रामस्थांचा आंदोलनाला विरोध का?
 

मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे अंतरवाली सराटी आणि आसपासच्या भागातील सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. तसंच या कारणामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. अंतरवाली सराटीमधून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रावर उपसरपंच आणि पाच ग्रामपंचायत सदस्यांसह एकूण ७० ग्रामस्थांच्या सह्या आहेत. 'हे आंदोलन भरकटत चाललं आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान, गावातील जातीय सलोखा बिघडला होता. लोक एकमेकांशी बोलत नाहीत,' असा दावा जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी केलाय.   
 

दरम्यान, ग्रामस्थांनी केलेल्या विरोधाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याचं समजते. लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता लागली असल्यानं मनोज जरांगे यांना आंदोलन करता आलं नाही. आता ८ जून रोजी आमरण उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं होतं.

Web Title: Don t accept permission denied I won t back down Manoj Jarange patil insists on hunger strike maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.