अंबाबाई-जोतिबा मंदिरातील दान पेट्या उघडल्या

By admin | Published: November 16, 2016 06:54 PM2016-11-16T18:54:56+5:302016-11-16T18:54:56+5:30

भाविकांनी देवाला देणगी रूपात अर्पण केलेल्या पाचशे, हजाराच्या नोटा बँकेत भरणा करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारितील अंबाबाई मंदिर

The donated boxes are opened in Ambabai-Jotiba temple | अंबाबाई-जोतिबा मंदिरातील दान पेट्या उघडल्या

अंबाबाई-जोतिबा मंदिरातील दान पेट्या उघडल्या

Next

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १६ : भाविकांनी देवाला देणगी रूपात अर्पण केलेल्या पाचशे, हजाराच्या नोटा बँकेत भरणा करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारितील अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिरासह कोल्हापूर, सांगली, सिंधूदूर्ग या जिल्ह्यातील अन्य मंदिरांमधील दानपेट्या बुधवारपासून उघडण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दानपेट्यातील रकमेची मोजदाद सुरु असून पुढील आठवड्यापर्यंत हे काम चालेल.

केंद्र सरकारने पाचशे हजाराच्या नोटा चलनातून रद्द करून त्या बँकेत भरण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील तीन हजार मंदिरे आहेत. या यातील बहुतांशी मंदिरे ही ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात बुधवारपासून ग्रामीण भागातील मंदिरांमधील दानपेट्या उघडण्यात येत आहेत. या दानपेट्यांमधील रक्कम त्या त्या भागातील बँकांमध्ये असलेल्या देवस्थान समितीच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामधून देवस्थान समितीला सर्वांत जास्त उत्पन्न मिळते. त्यानंतर नंबर लागतो तो वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिराचा. जोतिबा मंदिरातील दानपेटी तसेच सांगली जिल्ह्यातील हरिपूर, रामलिंग मंदिर येथील दानपेट्या बुधवारी उघडण्यात आल्या. संध्याकाळी अंबाबाई मंदिरातील पाच दानपेट्या उघडण्यात आल्या. शहरातील देवस्थान समितीच्या अखत्यारित असणाऱ्या बिनखांबी गणेश मंदिर, ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिर, दत्त भिक्षालिंग मंदिर, कात्यायनी मंदिर, त्र्यंबोली मंदिर अशा अन्य मंदिरांतील दानपेट्यादेखील या आठवड्यात उघडण्यात येणार आहेत. या दानपेट्या उघडण्यासाठी व रकमा बँकेत भरण्यासाठी देवस्थान समितीचे बहुतांशी कर्मचारी सध्या पैसे मोजण्यात व्यस्त आहेत. पाचशे, हजाराच्या नोटा डिसेंबरअखेर बँकेत भरणा करता येणार आहेत. तोपर्यंत देवस्थान समितीला पुन्हा एकदा या दानपेट्या उघडाव्या लागणार आहेत.


जोतिबा मंदिरात पावणे दोन लाख
वाडी रत्नागिरी येथील जोतिबा देवस्थानमधील दानपेट्या सप्टेंबरमध्ये उघडण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या बुधवारी उघडण्यात आल्या असून, देणगी रूपात मिळालेले पावणेदोन लाख रुपये बँकेत भरणा करण्यात आले आहेत.

तीन हजार मंदिरे आणि दानपेट्या
देवस्थान समितीच्या अखत्यारित तीन हजार मंदिरे असली तरी मोजक्याच मंदिरात समितीच्या दानपेट्या आहेत. ग्रामीण भागातील काही मंदिरांमध्ये उपसमिती असल्याने तेथील उत्पन्न उपसमितीला जाते. काही मंदिरे जंगलात, डोंगराळ भागात आहेत. त्यामुळे तेथेही दानपेट्या नाहीत. अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिर, ओढ्यावरील गणेश मंदिर, दत्त भिक्षालिंग मंदिर, कात्यायनी मंदिर, त्र्यंबोली देवी मंदिर अशा सर्व मंदिरांच्या मिळून दानपेट्या आहेत. त्यातील १३ दानपेट्या या केवळ अंबाबाई मंदिरातील आहेत.

नवरात्रौत्सवाचे उत्पन्न ५७ लाख
करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. या काळात २५ लाखांहून अधिक भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या कालावधीत देवस्थान समितीच्या दानपेटीत सर्वाधिक रक्कम देणगीच्या रूपाने जमा होते. यंदाच्या नवरात्रौत्सवात ५७ लाख रुपये समितीच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

Web Title: The donated boxes are opened in Ambabai-Jotiba temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.