‘लालबागचा राजा’च्या पेटीत कोटींचे दान
By admin | Published: September 15, 2016 02:47 AM2016-09-15T02:47:36+5:302016-09-15T02:47:36+5:30
‘लालबागचा राजा’च्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या दानामुळे मंडळाची तिजोरी भरली आहे. बुधवारपर्यंत ‘राजा’च्या दानपेटीत ५ कोटी ३७ लाख ५० हजार रुपये जमा झाले आहेत
मुंबई : ‘लालबागचा राजा’च्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या दानामुळे मंडळाची तिजोरी भरली आहे. बुधवारपर्यंत ‘राजा’च्या दानपेटीत ५ कोटी ३७ लाख ५० हजार रुपये जमा झाले आहेत. याउलट ४ हजार ४१९ ग्रॅम सोने आणि ६८ हजार ३२६ ग्रॅम चांदीचे दागिनेही ‘राजा’ला अर्पण करण्यात आले आहे.
मंडळाचे खजिनदार महेश जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाच्या दरबारात स्टेजजवळ दोन आणि रांगेत आठ अशा एकूण १० दानपेट्या ठेवल्या आहेत. यात बुधवारी सायंकाळपर्यंत दानपेट्यांमधून २ कोटी ५३ लाख ९० हजारांचे दान जमा झाले, तर रांगेतील दानपेट्यांमध्ये ३ कोटी १९ लाख ६० हजार रुपये मंडळाला मिळाले आहेत.
रोख रकमेशिवाय लालबाग राजाच्या चरणी अर्पण होणाऱ्या दागिन्यांची किंमतही कोट्यवधींच्या घरात आहे. त्यात ४ हजार ४१९.१९० ग्रॅमचे सोन्याचे आणि ६८ हजार ३२६ ग्रॅमचे चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहेत. मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी सांगितले की, बाजारभावानुसार या सोन्याच्या दागिन्यांची किंमत सुमारे १ कोटी ३६ लाख ९९ हजार २१० रुपयांच्या घरात आहे, तर चांदीच्या दागिन्यांची किंमत ३२ लाख ११ हजार ३२२ रुपये होते. त्यामुळे राजाच्या दानपेटीतून मंडळाकडे सुमारे सात कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. (प्रतिनिधी)
लालबागच्या राजाला मंडपातून बाहेर काढताना भाविकांच्या गर्दीत भर पडणार आहे. या परिसरात चोरीच्या घटनांत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.