गुरुपौर्णिमेला साईबाबांना प्लाझ्माचे दान; साईसंस्थानचे कोरोनामुक्त भाविकांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 03:58 AM2020-07-03T03:58:22+5:302020-07-03T03:58:33+5:30
स्वेच्छेने व बाबांवरील श्रद्धेपोटी रक्तातील प्लाझ्मा दान देऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी पूर्ण कोविड मुक्त झाल्यानंतर २८ दिवसांनी आपल्या जवळच्या रक्तदान केंद्रावर जाऊन यासाठी रक्तदान करावे.
शिर्डी : देशभरातील लाखो रूग्ण कोविड आजारावर मात करून पूर्ण बरे होत आहेत़ यात साईबाबांवर अढळ श्रद्धा असणाऱ्या व बाबांना गुरूस्थानी मानणाºया भाविकांची संख्याही लक्षणीय आहे. कोरोनामुक्त झालेल्या या भाविकांनी यंदा गुरूपौर्णिमेनिमित्त रक्तातील प्लाझ्माचे दान करावे, असे आवाहन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी केले आहे.
स्वेच्छेने व बाबांवरील श्रद्धेपोटी रक्तातील प्लाझ्मा दान देऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी पूर्ण कोविड मुक्त झाल्यानंतर २८ दिवसांनी आपल्या जवळच्या रक्तदान केंद्रावर जाऊन यासाठी रक्तदान करावे. तसेच त्यांनी त्यांचा फोटो, नाव, पत्ता व डोनेशन कार्ड संस्थानला माहितीसाठी saibaba@sai.org.in या मेलवर पाठवावे.
साईबाबांना गुरूपौर्णिमेलाच नाही तर वर्षभर दान देणारे देशभरात लाखो भाविक आहेत़ पीडित रूग्णांवरील प्रभावी उपचारासाठी कोविड आजारावर मात करून बरे झालेल्या रूग्णांच्या प्लाझ्माची गरज आहे़ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आवाहन केले आहे़ ही साईबाबांसाठी अमूल्य गुरूदक्षिणा असेल, असे डोंगरे यांनी म्हटले आहे़
रक्तदान शिबिराचे आयोजन
साईसंस्थानच्या रूग्णालयालाही सध्या रक्ताचा तुटवडा भासत आहे़ रक्ताच्या उपलब्धतेसाठी संस्थानच्या रक्तपेढीने यंदा गुरूपौर्णिमेच्या दिवशी साईआश्रम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे़ साईसंस्थानच्या रक्तपेढीकडे रक्तातील प्लाझ्मा वेगळा करणारी यंत्रणा आहे़ मात्र त्यासाठी लागणारी संबंधित संस्थेची अनुमती नाही़ संस्थानचे रूग्णालय प्रशासन ही मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डोंगरे यांनी सांगितले़