मराठा इतिहास जतनासाठी १ कोटीची देणगी; कर्नाटकातील मुरकुंबी कुटुंबाचे दातृत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 05:55 AM2021-10-17T05:55:22+5:302021-10-17T05:55:36+5:30
मराठा साम्राज्याचा देदीप्यमान इतिहास सर्वांसाठी खुला व्हावा, यासाठी कर्नाटकातील एक मराठी उद्योजक पुढे आले आहेत.
- राजू इनामदार
पुणे : मराठा साम्राज्याचा देदीप्यमान इतिहास सर्वांसाठी खुला व्हावा, यासाठी कर्नाटकातील एक मराठी उद्योजक पुढे आले आहेत. त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाला तब्बल एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यातील ३५ लाख रुपयांच्या प्रकल्पाचे काम सुरूही झाले आहे. भारत इतिहास संशोधन मंडळातील १० लाखांपेक्षाही अधिक कागदपत्रांचे यात डिजिटायझेशन होईल, ती संकेतस्थळावरून सर्वांसाठी खुली होतील, त्यांचे लिप्यंतर होऊन ती सामान्य वाचकांनाही उपलब्ध होतील. दोन वर्षांच्या या प्रकल्पाला नरेंद्र मुरकुंबी यांच्या देणगीतून विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरुवात करण्यात आली.
मुरकुंबी कुटुंब मूळचे मराठी. मात्र, अनेक वर्षांपासून कर्नाटकात स्थायिक झाले आहे. नरेंद्र यांच्या आई विद्याताई यांना मराठी साम्राज्याच्या इतिहासाची आवड. नरेंद्र यांच्यातही ती आली.
मुरकुंबी म्हणाले, १६३० ते थेट १८१८ हा या काळातील महाराष्ट्राचा इतिहास झपाटून टाकणारा आहे. त्यासंबंधीची असंख्य कागदपत्रे अजूनही अप्रकाशित आहेत. मंडळात अशी १० लाखांपेक्षाही अधिक कागदपत्रे असल्याचे समजले. जगासमोर हे सर्व आणण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ते सहज शक्य आहे. त्यातून नवे संशोधक तयार व्हावेत, असे अपेक्षित आहे.
नव्या पिढीला होईल इतिहास माहिती
भांडारकर इन्स्टिट्यूट यांनी माफक शुल्क आकारून यासाठी दोन मोठे स्कॅनर दिले. अर्थसाहाय्याचे आणखी हात पुढे येतील. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यासाठीही प्रयत्न होत आहेत. वैभवशाली मराठा साम्राज्याच्या इतिहासाची नव्या पिढीला माहिती व्हावी, या अंत:प्रेरणेने उपक्रमाला सुरुवात केली असून या कामाला लवकरच गती मिळेल, असा विश्वास नरेंद्र मुरकुंबी यांनी व्यक्त केला.