नेत्रदानाला नाही ‘अर्जाची’ आडकाठी
By admin | Published: June 9, 2016 01:13 AM2016-06-09T01:13:42+5:302016-06-09T01:13:42+5:30
नेत्रदानासाठी अर्ज केला होता, याचा कोणताही डेटा उपलब्ध नाही आणि अर्ज भरला तरी कुटुंबीयांची परवानगी असल्याशिवाय नेत्रदान होऊ शकत नाही.
पुणे : एखादी व्यक्ती गेली, तरी तिने पूर्वी नेत्रदानासाठी अर्ज केला होता, याचा कोणताही डेटा उपलब्ध नाही आणि अर्ज भरला तरी कुटुंबीयांची परवानगी असल्याशिवाय नेत्रदान होऊ शकत नाही. म्हणूनच आता कुटुंबीयांना मृत व्यक्तीचे नेत्रदान करायची इच्छा असेल, तर त्यांनीच डॉक्टरांशी संपर्क साधून ६ तासांच्या आत डोळे नेत्रपेढीकडे सुपूर्त केले, तर दुसरा जीव ही सुंदर सृष्टी बघू शकणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची कोणतीच आडकाठी राहिलेली नाही, असे पुणे नेत्रतज्ज्ञ संघटनेचे सदस्य डॉ. बबन डोळस यांनी सांगितले. उद्या (दि. १०) जागतिक दृष्टिदान दिन आहे, त्यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, आजमितीला संपूर्ण देशभरात वर्षभरात १ लाख नेत्रांची गरज भासत असून, महाराष्ट्रात हा आकडा ३० ते ४० हजारच्या आसपास आहे. मात्र, राज्यात नेत्रदात्यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असून, दर वर्षी केवळ ३,००० दातेच मृत्यूनंतर नेत्रदान करण्यासाठी तयार होत आहेत.
आज विविध गणेश मंडळांसह अनेक संघटनांच्या माध्यमातून नेत्रदानासंबंधी अर्जांचे वाटप केले जाते आणि ते भरून घेतले जातात. मात्र, या अर्जांचा डेटा जतन करून ठेवला जात नाही. शासकीय स्तरावरही या अर्जांची कोणतीच माहिती उपलब्ध नाही आणि मुळातच त्या अर्जांना कायदेशीर आधार नाही. कुणीही व्यक्ती नंतर त्याचा पाठपुरावा करीत नाही. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी त्याने नेत्रदानासंबंधी अर्ज भरल असेल, तर त्याचा डेटाच उपलब्ध नसल्याने त्या अर्जाला काहीच अर्थ राहत नाही, असे पुणे नेत्रतज्ज्ञ संघटनेचे सदस्य व ग्लोबल व्हिजन फाउंडेशन नेत्रपेढीचे संस्थापक डॉ. बबन डोळस यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
>केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, आजमितीला संपूर्ण देशभरात वर्षभरात १ लाख नेत्रांची गरज भासत असून, महाराष्ट्रात हा आकडा ३० ते ४० हजारच्या आसपास आहे. मात्र, राज्यात नेत्रदात्यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असून, दर वर्षी केवळ ३,००० दातेच मृत्यूनंतर नेत्रदान करण्यासाठी तयार होत आहेत.