खचू नका, शाखा लोकांना खुल्या करा; मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:12 IST2025-01-02T13:11:29+5:302025-01-02T13:12:12+5:30
मनसेची शाखा, कार्यालये पुन्हा लोकांसाठी खुली करा, अशा सूचना राज ठाकरे यांनी बुधवारी पदाधिकारी आणि मनसैनिकांना दिल्या...

खचू नका, शाखा लोकांना खुल्या करा; मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाटी कोरीच राहिली. त्यामुळे हतोत्साहित झालेल्या कार्यकर्त्यांना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. निकालांमुळे खचून जाऊ नका. मनातली खंत बाजूला ठेवा. जे घडले ते विसरून नव्या बदलांसह पुढे जायला हवे. महागाईने होरपळलेल्यांना दिलासा द्यायला हवा. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनण्याचा प्रयत्न करा. मनसेची शाखा, कार्यालये पुन्हा लोकांसाठी खुली करा, अशा सूचना राज ठाकरे यांनी बुधवारी पदाधिकारी आणि मनसैनिकांना दिल्या.
पक्ष कार्यालयात महिलांसाठी संपर्क कक्ष
- राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे निवारण करण्यासाठी पक्ष कार्यालयात महिलांसाठी संपर्क कक्ष सुरू करा, अशी सूचना राज ठाकरे यांनी मनसैनिकांनी केली.
- अन्याय, अत्याचारग्रस्त महिलांच्या तक्रारी संबंधित पोलिस ठाण्यांत नोंदवून घेतल्या जात नसतील तर त्याचा पाठपुरावा करा, असे आवाहन त्यांनी केले.
- पोलिसांकडे काही घडले नाही तर अत्याचारी नराधमाला फोडून काढा, असे राज ठाकरे यांनी पक्षकार्यकर्त्यांना सांगितले.
मराठी माणूस मुंबईत असुरक्षित!
मतदानावेळी मतदार पक्षाकडे पाठ फिरवतात. तरी मराठी लोकांवर अत्याचार होत असताना सर्वांत आधी आपणच धावले पाहिजे. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आपण हे करीत नाही. शतकातील पावशतक संपायला आले तरी अनेक गोष्टी तशाच आहेत. मुंबईत मराठी माणसाला असुरक्षित वाटत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
शेतकरी, कष्टकरी यांचे आयुष्य महागाईने होरपळून निघाले आहे. निकालानंतर काही आठवड्यातच मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरू झाली, असे ते म्हणाले.