'निवडणूक जिंकून आनंदी होऊ नका, लोक उद्या प्रश्न विचारतील', नितीन गडकरींचा रोख कुणाकडे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 18:42 IST2025-01-12T18:42:03+5:302025-01-12T18:42:51+5:30
'महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला अभूतपूर्व विजय मिळवून दिला, आता त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची वेळ आहे.'

'निवडणूक जिंकून आनंदी होऊ नका, लोक उद्या प्रश्न विचारतील', नितीन गडकरींचा रोख कुणाकडे?
Nitin Gadkari In BJP Convention: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (12 जानेवारी 2025) महाराष्ट्र भाजपच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपले कार्यकर्ते आणि निवडून आलेल्या नेत्यांना एक मोलाचा सल्ला दिला. 'फक्त निवडणुका जिंकून समाधानी न राहता, जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवायचे आहे', असे नितीन गडकरी म्हणाले.
📍 𝐒𝐡𝐢𝐫𝐝𝐢 | Addressing MAHA - ADHIVESHAN organised by Bharatiya Janata Party🪷, Maharashtra Pradesh https://t.co/iwpHnKyxUi
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 12, 2025
गडकरी पुढे म्हणतात, 'महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला अभूतपूर्व विजय मिळवून दिला. त्यांनी शिवाजी महाराजांसारखे जनहिताचे सरकार दिले. आता आपल्यावर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची आणि सामाजिक एकोपा आणण्याची जबाबदारी आहे. महाराष्ट्रातील विजयानंतर आता राज्यात सुराज्य आणायचे आहे. सामजिक परिवर्तन सत्तेच्या माध्यमातून घडवून आणले पाहिजे,' अशी प्रतिक्रिया गडकरींनी यावेळी दिली.
आपल्या कृतीतून ओळख निर्माण होते
'निवडणुकीतील जय-पराजयाने कोणी लहान किंवा मोठा होत नाही. आपली ओळख आपल्या कामावरुनच ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवडणूक हरले, पण त्यांच्या विरोधातील विजयी उमेदवार कोणालाच माहीत नाही. याउलट, बाबासाहेब जगभर ओळखले जातात. महाराष्ट्रात जातीच्या राजकारणातून द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे, पण माणूस त्याच्या कामाने मोठा होतो, जातीने नाही.'
निवडणूक जिंकून आनंदी होऊ नका
'काँग्रेसचा पराभव करून समाधानी राहू नका. तुम्हाला लोकांच्या जीवनात बदल घडवून आणायचा आहे, नाहीतर तुम्ही काय केले? असा सवाल लोक विचारतील. त्यांनी जे केले, तेच तुम्ही करू नका. आपल्याला आधीच्या सरकारांपेक्षा दहापट चांगले काम करायचे आहे. महाराष्ट्रात प्रत्येक तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे. केवळ स्मार्ट शहरे नसून स्मार्ट गावे व्हायला हवीत. लोक मजबुरीने शहरात येतात. कार्यक्रमानंतर मी काश्मीरला जाणार आहे. उद्या पंतप्रधान मोदींसोबत बोगद्याचे उद्घाटन होणार आहे. मी काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांनी मला सांगितले की तुम्ही इतके चांगले रस्ते बनवलेत, पर्यटक तिपटीने वाढले आहेत. लोक वाढले. आज महाराष्ट्रात किती मोठी पर्यटन स्थळे आहेत? आयात कमी करणे आणि निर्यात वाढवणे ही सर्वात मोठी देशभक्ती आहे,' असंही गडकरी यावेळी म्हणाले.