...तरीही बेसावध राहू नका, आतापासूनच कामाला लागा, विधानसभेसाठी एकनाथ शिंदेंच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 09:02 AM2024-06-11T09:02:40+5:302024-06-11T09:25:50+5:30
Eknath Shinde News: विधानसभेसाठी भाजप, उद्धवसेनेपाठोपाठ शिंदेसेनेनेही कंबर कसली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी खासदार आणि आमदारांची बैठक घेतली. १५ पैकी ७ जागा जिंकून चांगला विजय संपादन केला आहे.
मुंबई - विधानसभेसाठी भाजप, उद्धवसेनेपाठोपाठ शिंदेसेनेनेही कंबर कसली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी खासदार आणि आमदारांची बैठक घेतली. १५ पैकी ७ जागा जिंकून चांगला विजय संपादन केला आहे. मात्र तरीही बेसावध राहू नका. विधानसभेसाठी आतापासूनच कामाला लागा, अशा सूचना शिंदे यांनी या बैठकीत आमदारांना केल्या.
महायुतीसोबतच आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्याला चांगले यश मिळाले आहे. काही ठिकाणी आपल्याला कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यादृष्टीने आपल्याला आता तयारी करायची असून कोणत्याही परिस्थितीत बेसावध राहू नका. मतदारसंघात पक्षबांधणी मजबूत करा. जे नाराज असतील त्यांची नाराजी दूर करा. आपले आमदार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याची रणनीती आखा, अशा सूचना शिंदे यांनी आमदारांना केल्या. तसेच, विजयी खासदारांना मतदारसंघातील आमदारांना सहकार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
तीन आमदार अनुपस्थित
या बैठकीला शिंदेसेनेचे ३९ आमदार उपस्थित होते, तीन आमदार मात्र अनुपस्थित राहिले. यामध्ये शहाजीबापू पाटील, संजय गायकवाड, राजेंद्र यड्रावकर या आमदारांचा समावेश असून पूर्वकल्पना देऊन हे आमदार या बैठकीला अनुपस्थित राहिल्याचे सांगण्यात आले.
‘त्यांची’ही बैठक
लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांचीही बैठक यावेळी घेण्यात आली. या बैठकीला यामिनी जाधव, राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, सदाशिव लोखंडे, संजय मंडलिक, बाबुराव कदम कोहळीकर, हेमंत पाटील उपस्थित होेते. राजू पारवे हे पूर्वपरवानगी घेऊन अनुपस्थित राहिले. यावेळी पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली.