दहावी, बारावी निकालाच्या तारखांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका : राज्य मंडळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 07:34 PM2020-05-17T19:34:52+5:302020-05-17T19:41:35+5:30
दहावी, बारावीच्या निकालाबाबत साेशल मीडियावर विविध तारखा जाहीर हाेत असल्याने आता बाेर्डाकडून या तारखांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी ,बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर परिणाम झाला असून परीक्षांचे निकाल लांबणार आहेत. परंतु, निकालाच्या विविध तारखा सोशल मीडियावर पसरविल्या जात आहेत. मात्र, या तारखांवर व अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये,असे आवाहन राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे यांनी केले आहे.
राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू असताना कोरोना विषाणूचा फैलाव होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्य शासनाने इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन पुढील काळात तो रद्द करावा लागला. तसेच शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम ठप्प झाले. त्यावर शासनाने शिक्षकांना घरी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी परवानगी दिली. मात्र, उत्तरपत्रिका शाळा-महाविद्यालयांमध्ये अडकून पडल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला वेग आला नाही. गेल्या काही दिवसांपासून शिक्षक शाळा महाविद्यालयांमधून उत्तरपत्रिका तपासून राज्य मंडळाकडे जमा करत आहेत. परंतु, सर्वाधिक कोरोना प्रभावित भागातील शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर ,अमरावती, नाशिक , लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे इयत्ता दहावी बारावीची परीक्षा घेण्यात आली. या सर्व विभागीय मंडळांची निकाल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय राज्य मंडळाला निकाल जाहीर करता येत नाही. एका विभागाचा निकाल तयार करण्यास उशीर झाला तरीही राज्याचा निकाल लांबतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांकडून फिजिकल डिस्टंन्सिगचे नियम पाळून निकाल तयार करण्याचे काम आता वेगाने केले जात आहे. परंतु, निकाल केव्हा जाहीर करता येऊ शकतो; याबाबतची आवश्यक असणारी माहिती (डेटा) अद्याप राज्य मंडळाकडे प्राप्त झालेली नाही. त्यामुळे निकालाची तारीख सद्यस्थितीत राज्य मंडळाला सांगता येत नाही, असे मंडळातील सूत्रांनी सांगितले. मात्र, सोशल मीडियावर निकालाच्या तारखा प्रसिद्ध होत असल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
दहावी-बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा व तारखांवर विद्यार्थी व पालकांनी विश्वास ठेवू नये. राज्य मंडळाकडून यथावकाश निकालाच्या तारखांबाबतची माहिती प्रसिद्ध केली जाईल.
- डॉ.शकुंतला काळे , अध्यक्ष ,राज्य शिक्षण मंडळ