‘’दर वाढले म्हणून बोंबलू नका, कांदा परवडत नसेल तर मुळा, लसूण खा’’ बच्चू कडूंचा सल्ला
By बाळकृष्ण परब | Published: October 21, 2020 12:53 PM2020-10-21T12:53:06+5:302020-10-21T13:02:35+5:30
Bacchu Kadu Statement on onion Price : कांद्याच्या वाढलेल्या भावांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला अजूनच कात्री लागणार आहे. या परिस्थितीत राज्य सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांनी अजब सल्ला दिला आहे.
अमरावती - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेले कांद्याचे भाव परतीच्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्यानंतर मोठ्याने भडकले आहेत. घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचे दर शंभर रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कांद्याच्या वाढलेल्या भावांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला अजूनच कात्री लागणार आहे. या परिस्थितीत दर वाढले म्हणून बोंबलू नका, जर कांदा परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खा, असा सल्ला राज्य सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.
कांद्याचा भाव वाढण्यामागचं कारण सांगताना बच्चू कडू म्हणाले की, केंद्र सरकारने इराणमधून कांदा आयात केल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र कांद्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्य माणसाने ओरडू नये. कांद्याचे भाव वाढले पाहिजेत कारण ७० वर्षांचा अनुशेष बाकी आहे. ज्यांना कांदा परवडत नसेल, त्यांनी मुळा, लसूण खावी, असा सल्लाही बच्चू कडू यांनी दिला.
दरम्यान, उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालला व नवीन पीक येण्यास विलंब लागणार असल्यामुळे देशात सर्वत्र कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. मागणीपेक्षा आवक कमी होत असल्यामुळे बाजारभाव वाढत आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी ७०५ टन कांद्याची आवक झाली असून होलसेल मार्केटमध्ये ४० ते ७० रुपयांनी त्याची विक्री होत होती.
किरकोळ मार्केटमध्येही कांद्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. मध्यम दर्जाचा कांदा ६० रुपये व चांगल्या दर्जाचा कांदा ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. सद्य:स्थितीत मुंबईमध्ये नाशिक, पुणे, अहमदनगरमधून कांद्याची आवक होत आहे. उत्पादक जिल्ह्यांमध्येच दर वाढल्यामुळे मुंबईमध्येही प्रतिदिन भाव वाढत आहेत.