"खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा", अर्थसंकल्पाविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर मविआचं आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 12:50 PM2024-06-29T12:50:53+5:302024-06-29T12:52:11+5:30
Maharashtra Assembly Session 2024: अर्थसंकल्पामधून सरकारने अनेक लोकानुनयी आणि लोकप्रिय घोषणा केल्या आहेत. आता या घोषणांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. आज विधिमंडळाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांनी विधान भवनांच्या पायऱ्यांवर अर्थसंकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत बसलेला पराभवाचा धक्का आणि चार महिन्यावर आलेली विधानसभेची निवडणूक या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २०२४-२५ या वर्षासाठीचा आपला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामधून सरकारने अनेक लोकानुनयी आणि लोकप्रिय घोषणा केल्या आहेत. आता या घोषणांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. आज विधिमंडळाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनांच्या पायऱ्यांवर अर्थसंकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प म्हणजे तिजोरीत खळखळाट अन् थापांचा सुळसुळाट, बजेटमधून विधानसभेच्या तयारीच्या येतोय वास, या घोषणांनी आज विधानभवनाचा परिसर दणाणला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर आज जोरदार निदर्शने करत महायुतीच्या अर्थसंकल्पाची पोलखोल केली.
लोकसभा निवडणुकीचा घेतला धसका, विधानसभेला मस्का अशी महायुतीची अवस्था आहे. बजेटमध्ये मोठ्या घोषणांचा पाऊस पडला पण हा तर विधानसभा निवडणुकीसाठी युतीचा आटापिटा आहे यावरून महाविकास आघाडीने जोरदार आंदोलन केले. भाऊ म्हणून दाखवलं महिलांना योजनांचे भुल, महिलाच करतील निवडणुकीत गूल, निधीची वानवा आणि खैरातीचा गारवा अशा जोरदार घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिल्या.
खिशात नाही आण आणि मला बाजीराव म्हणा, लुटारू सरकार हाय हाय, ४० टक्के कमिशन घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो या घोषणातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अर्थसंकल्पाची पोलखोल केली. या घोषणांचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.