CoronaVirus: यंदा बाबासाहेबांची जयंती घरातच साजरी करा; प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 11:19 AM2020-04-07T11:19:46+5:302020-04-07T11:21:36+5:30
CoronaVirus: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक जयंती टाळण्याचं आवाहन
मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्यानं संसर्ग टाळण्यासाठी घरीच राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र तरीही अनेक जण याकडे गांभीर्यानं पाहत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन न करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
११ एप्रिलला महात्मा फुलेंची, तर १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या दोन्ही जयंत्या घरातच साजऱ्या करण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. 'ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण घरातच साजरी करावी, असं आवाहन मी सर्व फुले, शाहू, आंबेडकरी जनतेला करतो. जयंती कशी साजरी केली त्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियामार्फत दाखवता येतील. पण कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक जयंती साजरी होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे', असं आवाहन आंबेडकर यांनी केलं.
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत झपाट्यानं वाढ होत आहे. राज्यात कोरोनाचे साडे आठशेपेक्षा अधिक रुग्ण आहेत. यातील तब्बल ६०० हून जास्त रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. वरळी कोळीवाडा, धारावी यासारख्या लोकसंख्येची घनता अतिशय जास्त असलेल्या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्यानं आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. यानंतर तमिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, केरळचा क्रमांक लागतो.