कासच्या सुंदर पुष्प पठारावर तरी जेसीबी चालवू नका!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 06:17 AM2023-04-11T06:17:27+5:302023-04-11T06:18:07+5:30
‘कास पठार येथील अनधिकृत बांधकामांना परवानगी देताच कशी’, असा संतप्त सवाल राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणात एका याचिकेद्वारे विचारण्यात आला आहे.
‘कास पठार येथील अनधिकृत बांधकामांना परवानगी देताच कशी’, असा संतप्त सवाल राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणात एका याचिकेद्वारे विचारण्यात आला आहे. कास पठार परिसरात गेल्या काही वर्षांत अनधिकृत बांधकामे / अतिक्रमणे वाढली आहेत. यामुळे पर्यावरणाची हानी होत असताना अनधिकृत १५५ बांधकामे अधिकृत करण्याचा घाट घातला जात आहे.
कास पठारावर रानफुलांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसास्थळांच्या संरक्षित यादीत समावेश करण्यात आला आहे. पर्यावरणदृष्ट्या अतिशय संवेदनशील कास पठारावर अनधिकृत बांधकामे वाढणे आणि ती अधिकृत करणे हे अत्यंत असंवेदनशील, अदूरदृष्टीपणाचे लक्षण आहे.
मध्यंतरी कास पठारावर कथित पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात लेझर शो, संगीत, नाचगाण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खाद्यपदार्थांची रेलचेलदेखील होती. या कार्यक्रमाचे आयोजन खाजगी पातळीवर करण्यात आले होते. तरी त्याला शासनाच्या विविध विभागांचा वरदहस्त होता. अन्यथा जागतिक स्थळाचा वारसा लाभलेल्या कास पठारावर एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे ना आयोजन होणे शक्य होते, ना झाडे तोडत सपाटीकरणासाठी जेसीबीसारखी वाहने वापरणे शक्य होते. पर्यावरण जतन, संरक्षण आणि संवर्धनाबाबतची ही आपली सामाजिक, राजकीय समज !
रामदास स्वामींनी फांदीच्या शेंड्यावर बसून बुडाकडील फांदी तोडणाऱ्या आत्ममग्न इसमाची संभावना ऐतिहासिक मूर्ख अशी केली आहेच ! - आपलीही गत तशीच झाली आहे.
- बाळकृष्ण शिंदे, पुणे