वृत्तपत्रांतील बातम्या वाचून विचलित होऊ नका; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं
By विश्वास पाटील | Published: August 14, 2023 07:41 PM2023-08-14T19:41:53+5:302023-08-14T19:42:11+5:30
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी बारामतीत जाऊन भेट घेतली
कोल्हापूर : कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही... यापुढील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दिली. वृत्तपत्रांतून येणाऱ्या बातम्यांनी विचलित होऊ नका, जातीयवादी पक्षासोबत जायचे नाही, ही दिशा स्पष्ट आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी बारामतीत जाऊन भेट घेतली व पक्षाच्या जिल्ह्यातील स्थितीची माहिती दिली. पवार यांनी कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून समाधान व्यक्त केले. पवार म्हणाले, कोणताही विचार न करता जातीयवादी पक्षाच्या विरोधात ठामपणे मैदानात उतरा. जनतेमध्ये भाजपबाबत फार नकारात्मक वातावरण आहे. त्यांना चांगला पर्याय देऊ.
व्ही. बी. पाटील यांनी जिल्ह्यातील तालुकावार मेळाव्यांची माहिती देऊन पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली. यावेळी प्रदेश प्रवक्ते राजीव आवळे, नितीन जांभळे, मदन कारंडे, अश्विनी माने, पदमा तिवले, युवक अध्यक्ष रोहित पाटील, अमर चव्हाण, शिवाजी खोत, मुकुंद देसाई, सुनील देसाई, शिवाजी सावंत, धनाजी करवते, सरोजिनी जाधव, अंजली पोळ आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.
नऊ हजार सायकली...
राष्ट्रवादीतील फुटीनंतर लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याची दोन उदाहरणे देऊन पवार यांनी हुरुप वाढवला. ते म्हणाले, नाशिकला पहिल्यांदा गेल्यावर सभेच्या ठिकाणी सगळ्या सायकलीच होत्या. मला आश्चर्य वाटले, की एवढ्या सायकली कशा म्हणून.. कार्यकर्त्यांनी सांगितले, सभेला कार्यकर्ते सायकलवरून आले आहेत. मग, मी त्या मोजायला सांगितल्यावर त्या नऊ हजार असल्याचे स्पष्ट झाले. सोलापूर दौऱ्यातही रविवारी विडी वळणाऱ्या महिला सुपातून विड्यांसह भेटायला आल्या होत्या. त्यांनी गाडी अडवली व तुम्ही या वयात आमच्यासाठी राबताय, आम्ही तुमच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
२५ ला कोल्हापूर दौरा शक्य
शरद पवार येत्या २५ ऑगस्टला कोल्हापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत त्याचे नियोजन कळवतो, असे त्यांनी चर्चेत सांगितले.