स्थानिक निवडणुकांना मुहूर्त मिळेना! सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 11:25 PM2024-06-20T23:25:58+5:302024-06-20T23:26:12+5:30
राज्यात यंदा दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. १४ जिल्ह्यांत सुरुवातीच्या सरासरीच्या १०० टक्के तर पाच जिल्ह्यांत ७० टक्के पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून होत नसताना पावसाळ्यामुळे हजारो सहकारी संस्थांच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील ८३०५ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
या निवडणुका महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ७३कब मधील तरतुदीनुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राबविण्यात येतात. 2024-25 या वर्षात राज्यातील २४,७१० सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित आहे. यापैकी ८३०५ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु होती. ती पावसामुळे ३० सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पावसाळा आणि शेतकरी शेतीत व्यस्त असणार या कारणामुळे राज्य सरकारने ही निवडणूक पुढे ढकलण्याचा आदेश काढला आहे.
राज्यात यंदा दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. १४ जिल्ह्यांत सुरुवातीच्या सरासरीच्या १०० टक्के तर पाच जिल्ह्यांत ७० टक्के पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे. यामुळे निवडणुका घेणे उचित ठरणार नाही, असा विचार राज्य शासनाने केला आहे. नव्या वर्षात निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्था तसेच आतापर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या सुमारे 38 हजार 740 सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्य सरकारने यापूर्वी 31 मेपर्यंत स्थगिती दिली होती. आता पावसाळा संपल्यानंतर विधानसभा लागणार आहे. यामुळे या निवडणुकांना जानेवारीच उजाडण्याची शक्यता आहे.