मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा; पाणीप्रश्नावर मुख्यमंत्री ठाकरे संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 02:54 PM2022-06-02T14:54:45+5:302022-06-02T14:55:34+5:30
सध्याच्या पाणी वितरणात किती आणि कसे पाणी वाढवून मिळेल याकडे विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पाहावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
मुंबई - औरंगाबाद शहराच्या पाणीप्रश्नावरून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर विरोधकांनी टीकास्त्र सोडलं आहे. त्यात येत्या ८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीरसभा होणार आहे. तत्पूर्वी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा असा आदेशच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे. नवीन योजना पूर्ण होईपर्यंत कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या पाणी वितरणात किती आणि कसे पाणी वाढवून मिळेल याकडे विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पाहावे अशा सूचना त्यांनी केल्या.
तसेच औरंगाबाद शहर पाणी पुरवठ्याच्या १६८० कोटी रुपयांची ही योजना गतीने पूर्ण व्हावी म्हणून या योजनेचा कालबध्द रितीने आढावा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून घ्यावा. या योजनेला वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन काहीही कमी पडू देणार नाही, यातील उणिवा प्राधान्याने दूर करून शहरातील नागरिकांना व्यवस्थित पिण्याचे पाणी मिळेल. या नव्या पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार संथ गतीने काम करीत असल्याच्या तक्रारी आहेत ही अतिशय गंभीर बाब असून त्यांनी कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास विविध कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
MIM नं दिला होतं चॅलेंज
उद्धव ठाकरे जाहीर सभा घेतील पण औरंगाबादला पाणी देऊ शकणार नाहीत. ते फक्त इथं देऊन धर्माचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा काढणार आहेत. ज्या शहराला ते महापुरुषाचं नाव देत आहेत. त्या शहराला सध्या दहा दिवसांच्याआड पाणी येत आहे. याचा ते विचारही करत नाहीयत. उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहराला पाणी कधी मिळणार याची नेमकी तारीख जाहीर केली तर ज्या मार्गानं ते जाणार आहेत. त्या मार्गावर फुलांची उधळण आम्ही करू", असं आव्हान MIM खासदार इम्तियाज जलील यांनी दिलं आहे.