'बायकोला फक्त स्टेजवर आणि टीव्हीवरच दिसतो'; सुप्रिया सुळेंची अपेक्षा ऐकून रोहित पवारांनाही हसू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 04:19 PM2024-08-25T16:19:33+5:302024-08-25T16:23:22+5:30
Supriya Sule News: कर्जत-जामखेड मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांच्या कामाचं कौतुक केले. त्याचबरोबर त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली, ती ऐकून रोहित पवारांसह सगळ्यांनाच हसू आवरता आले नाही.
Supriya Sule Rohit Pawar: रोहित पवारांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत-जामखेडमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांच्या कामाचं कौतुक केले, तसेच एक तक्रारही केली. उपस्थितांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, रोहित पवार सतत बाहेर असतात. त्यामुळे माझी त्यांच्याकडे एक अपेक्षा आहे. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी अपेक्षा काय, तेही सांगितलं. सुप्रिया सुळेंची अपेक्षा ऐकून रोहित पवारांना हसू आलेच, पण उपस्थितही लोटपोट झाले.
कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधताना रोहित पवारांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.
सुप्रिया सुळे रोहित पवारांबद्दल काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे या कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की, "तू (रोहित पवार) दिल्लीतून म्हणतोय... चंद्रावरून कुणी आले ना, तरी तुलाच मतदान मिळणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय की, यावेळी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. तुतारीच इथे वाजणार आहे."
रोहित माझ्या भावाचा मुलगा आहे म्हणून नाही. रोहितने स्वतःची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात करून दाखवली आहे. प्रचंड कष्ट करतो. त्याची बायको इथे बसलीये. बायकोला फक्त स्टेजवर आणि टीव्हीवरच दिसतो. घरात तर मला कधी दिसत नाही तो." या सुप्रिया सुळेंच्या विधानावर सगळेच हसले.
रोहित पवारांना सुप्रिया सुळेंनी काय दिला सल्ला?
"कुंती, तुझी ओळख आहे की नाही रोहितशी. पण, हे खरंय की तो घरी जातो... आता पोरं म्हणत असतील की, हा कोण पाहुणा आपल्या घरी येतो. त्याला मी सांगितलं कुंतीसाठी घरी नको जाऊ, पण पोरांसाठी जा. वडिलांची पण जबाबदारी मोठी असते", असे सुप्रिया सुळेंनी म्हणताच रोहित पवारांनाही हसू अनावर झाले.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, "ज्या पद्धतीने त्याने पूर्ण आयुष्य कर्जत-जामखेड आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी... तो पूर्ण वेळ देतो. याचा आम्हाला अभिमान आहे. जशा रोहितकडून तुमच्या अपेक्षा आहेत. तशा आमच्याही त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्याने थोडासा वेळ आमच्या नातवंडांसाठी द्यावा, ही माझी त्याच्याकडून अपेक्षा आहे", असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
"तो सगळे दिवस बाहेर असतो. कुठे आंदोलन झाले, पहिला रोहित पोहोचतो. कुणी उपोषणाला बसले, तो तिथे पोहोचतो. प्रत्येकाच्या सुख-दुखात पहिला पोहोचणारा कोण असेल, तर महाराष्ट्रात रोहित पवार आहे, हे सांगायला मला प्रचंड आनंद होतोय, असे कौतुकही सुप्रिया सुळे यांनी केले.