'शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघात घुसखोरी नको', भाजप मंत्र्यांना आदेश

By यदू जोशी | Published: September 25, 2022 08:49 AM2022-09-25T08:49:04+5:302022-09-25T08:50:21+5:30

७८ मतदारसंघांमध्ये मंत्री फिरणार. भाजपचे मिशन १७५

Don't intrude into the constituencies of MLAs from the eknath Shinde group orders BJP ministers | 'शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघात घुसखोरी नको', भाजप मंत्र्यांना आदेश

'शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघात घुसखोरी नको', भाजप मंत्र्यांना आदेश

googlenewsNext

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील खासदारांच्या मतदारसंघांमध्येही भाजपचे केंद्रीय मंत्री तीन-तीन दिवस तळ ठोकत असताना राज्यातील भाजपच्या मंत्र्यांनाही आता दौरे करण्याचे आदेश देण्यात आले असून, या दौऱ्यांमध्ये शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघांमध्ये मात्र भाजपचे मंत्री तूर्त जाणार नाहीत.

शिंदे गटातील खासदारांच्या मतदारसंघांमध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्यातील भाजपच्या मंत्र्यांना ७८ विधानसभा मतदारसंघांमध्ये जाण्यास सांगण्यात आले आहे. या मंत्र्यांना येत्या १८ महिन्यांमध्ये ९ वेळा वाटून दिलेल्या मतदारसंघात पाठविण्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निश्चित केले आहे. २००९ किंवा २०१४च्या निवडणुकीत भाजपने जिंकलेले, पण २०१९च्या निवडणुकीत गमावलेले ७८ विधानसभा मतदारसंघ यासाठी निश्चित केले आहेत.

भाजपचे मंत्री दर दोन महिन्यांतून एकदा या प्रमाणे १८ महिन्यांत नऊ वेळा या मतदारसंघांमध्ये तीन-तीन दिवस मुक्कामी जातील. जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करतील. तसेच पक्षकार्याचा आढावा, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीची स्थिती अन्य पक्षांमधून कोणाला पक्षात आणता येईल यासाठीची व्यूहरचना, केंद्रीय व प्रदेश भाजपने दिलेल्या पक्षकामांची काटेकोर अंमलबजावणी, याकडे हे मंत्री लक्ष देतील. तसेच, आपल्या दौऱ्यांचा अहवाल प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना देतील. मंत्र्यांच्या दौऱ्यांचे नियोजन करण्याची जबाबदारी आ. श्रीकांत भारतीय यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

भाजपचे मिशन @ १७५

  • २०१९च्या निवडणुकीत भाजपने १०५ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर पंढरपूरची पोटनिवडणूक जिंकल्याने संख्याबळ १०६ झाले. ज्या ७८ जागांवर आता पक्ष लक्ष केंद्रित करणार आहे, त्यातील ४० ते ४५ जागा जिंकल्या तरी भाजपचे स्वतःचेच संख्याबळ २०२४ मध्ये १४५ पार जाईल.
  • सोबत शिंदे सेना असेल. त्यामुळे किमान १७५ जागांचे लक्ष्य गाठता येईल, अशी रणनीती भाजपने आखली आहे. 
  • शिंदे गटातील काही स्थानिक भाजपमध्ये, तर भाजपातील स्थानिक नेते तेथील राजकीय परिस्थितीनुसार जात आहेत. मात्र, आपणच एकमेकांची माणसे फोडत असल्याचे त्यानिमित्ताने दिसत आहे, असे शक्यतो होऊ द्यायचे नाही यावर दोन्ही पक्षांत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
  • भाजपच्या मंत्र्यांनी कोणत्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून दौरे करायचे आहेत याचा रोडमॅप पुढील महिन्याच्या सुरुवातीला निश्चित केला जाईल आणि त्या रोड मॅपच्या आधारे मंत्री हे मतदारसंघ पिंजून काढतील.

Web Title: Don't intrude into the constituencies of MLAs from the eknath Shinde group orders BJP ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.