केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 12:05 AM2024-10-13T00:05:01+5:302024-10-13T00:11:17+5:30
माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर शरद पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
NCP Sharad Pawar ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर राज्यात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेवरून राज्य सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. या घटनेची फक्त चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून पदावरून दूर व्हा, अशा शब्दांत पवार यांनी सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांना फटकारलं आहे.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरून सरकावर टीका करताना शरद पवार यांनी म्हटलं आहे की, "राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे," अशा शब्दांत शरद पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसंच मी बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो, असंही पवार यांनी म्हटलं आहे.
वाय दर्जाची सुरक्षा असतानाही बाबा सिद्दिकींची हत्या!
बाबा सिद्दिकी यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर सरकारकडून त्यांना काही दिवसांपूर्वी वाय दर्जाची सुरक्षाही देण्यात आली होती. मात्र अशी सुरक्षा असतानाही आज त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून ही हत्या केली. बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडले जात होते. फटाक्यांच्या आवाजाच्या फायदा घेत हा गोळीबार करण्यात आला. सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी तीन जण तोंडाला रुमाल बांधून आले होते. या आरोपींकडून एकूण ६ गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे.