मी देवाधर्माचे प्रदर्शन करत नाही, आम्ही प्रबोधनकार वाचलेत; धर्माचा बाजार नको - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 07:50 AM2022-04-14T07:50:16+5:302022-04-14T07:51:12+5:30
‘राज ठाकरे यांच्या भाषणात भाजपबद्दल अवाक्षर नव्हते. महागाई, बेरोजगारीसारख्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांचा समावेश नव्हता. भाजपच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे भाषण झाले.
मुंबई :
‘राज ठाकरे यांच्या भाषणात भाजपबद्दल अवाक्षर नव्हते. महागाई, बेरोजगारीसारख्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांचा समावेश नव्हता. भाजपच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे भाषण झाले. भाजपने दिलेली जबाबदारी ते पार पाडत आहेत,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी राज ठाकरे यांच्या ठाण्यातील भाषणाचा समाचार घेतला. तर, मला माझ्या देवाधर्माचे प्रदर्शन करायला आवडत नाही, असे सांगत नास्तिकतेबद्दलच्या विधानावरही परखड भाष्य केले.
राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत राष्ट्रवादीवर हल्लाबोल करत केलेल्या आरोपांचा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून समाचार घेतला. एखादी व्यक्ती वर्ष-सहा महिन्यांतून वक्तव्य करून आपले मत व्यक्त करते, तेव्हा ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नसते. भाजपने केलेले मार्गदर्शन भाषणाच्या माध्यमातून ऐकायला मिळाले. त्यांचा एकच आमदार निवडून आलेला आहे. त्यांच्या सभा मोठ्या होतात. सभेला लोक जातात. त्या सभेत शिवराळ भाषा असो की नकला यातून मात्र लोकांची करमणूक होते, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
‘आम्ही प्रबोधनकार वाचले, त्यांच्या कुटुंबातले लोक वाचत नसावेत’
शरद पवार नास्तिक असल्याचे राज यांनी म्हटले होते. यावर, मी माझा धर्म आणि देव याबद्दल प्रदर्शन करत नाही. आजपर्यंत १३-१४ वेळा निवडणुकीला उभा राहिलो असेन. माझ्या निवडणूक प्रचाराचा नारळ कोणत्या मंदिरातून फुटतो, हे बारामतीच्या लोकांना जाऊन विचारा; पण आम्ही कधीही त्याचा गाजावाजा केला नाही. आयुष्यात माझ्यासमोर काही आदर्श आहेत, त्यापैकी प्रबोधनकार ठाकरे हे एक आहेत. प्रबोधनकारांनी देव किंवा धर्म यांच्या नावाने बाजार मांडणाऱ्यांवर प्रचंड टीका केली होती. याचा अर्थ त्यांनी धर्माचा अनादर केला नाही; पण देव आणि धर्माचा गैरफायदा घेणाऱ्या घटकांना चोपण्याचे काम केले. आम्ही प्रबोधनकारांचे लिखाण वाचतो; पण सर्वच जण किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक, ते वाचत नसावेत, असा टोलाही पवार यांनी लगावला.
मी आणि अजित वेगळे आहोत का?
अजित पवारांच्या घरी छापा पडतो; पण सुप्रिया सुळेंच्या नाही, या राज ठाकरे यांच्या विधानावर ते काहीतरी बालिश भाषण करतात. पोरकट आरोप असल्याची संभावना पवार यांनी केली. अजित पवारांकडे काही झाले तर माझ्याकडे झाले, असे आहे. अजित आणि मी वेगळे आहोत का? अजित आणि सुप्रिया बहीण- भाऊ नाहीत का?, अशा शब्दांत पवार यांनी संताप व्यक्त केला.
किरीट सोमय्यांची कृती आक्षेपार्ह
विक्रांतसाठी पैसे गोळा केले, हे बातम्यातून स्पष्ट दिसते आहे. पैसे गोळा केले तर त्याचा विनियोग काय केला? माझ्या वाचनात आले की, तो निधी पक्षाकडे जमा करण्यात आला. भावनेला हात घालून विक्रांतसाठी पैसे गोळा केले गेले. मग तो एक रुपया असो किंवा अकरा हजार रुपये ते पक्षाकडे का दिले? ते पैसे सैन्य दल किंवा नौदलला देता आले असते. माझ्या मते हे आक्षेपार्ह आहे, असे पवार म्हणाले.
छत्रपतींचेच विचार मांडतो
- दोनच दिवसांपूर्वी अमरावतीतील भाषणात २५ मिनिटे महाराजांच्या योगदानावर बोललो. अर्थात मला रोज वृत्तपत्र वाचायची सवय आहे. त्यासाठी लवकर उठावे लागते. खूपवेळा वृत्तपत्रात काय काय लिहिले आहे, हे न वाचता एखादा वक्तव्य करत असेल तर त्याला दोष देणार नाही.
- राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले काव्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी रचले होते. शाहू-फुले-आंबेडकर यांचा उल्लेख करणे म्हणजे शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्यासारखे आहे, असेही पवार म्हणाले.
- शिवरायांना घडविण्यात माँ जिजाऊंचे योगदान होते; परंतु पुरंदरेंनी ते वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न केला. तो योग्य नव्हता, असे माझे मत तेव्हाही होते व ते आजही कायम असल्याचे पवार म्हणाले.
- एस. टी. कामगारांच्या आंदोलनाला चुकीचे नेतृत्व मिळाले. या चमत्कारिक नेतृत्वाने फक्त माझ्याबाबत द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला.