आई-बाप काढू नका; अन्यथा भूकंप! एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 05:23 AM2022-07-31T05:23:32+5:302022-07-31T05:23:41+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मालेगाव येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांना इशारा

Don't take name of our parents; Otherwise earthquake! Eknath Shinde Warns shivsena's Uddhav Thackeray | आई-बाप काढू नका; अन्यथा भूकंप! एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

आई-बाप काढू नका; अन्यथा भूकंप! एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (जि. नाशिक) : गद्दारी कोणी केली, विश्वासघात कोणी केला, आम्ही कोणालाही पळवून नेले नाही. दिवस-रात्र मेहनत करून शिवसेना मोठी केली. आमचे आई-बाप काढू नका, धर्मवीर आनंद दिघे यांचा स्वर्गवास ही माझ्यासाठी सगळ्यात दु:खद घटना होती, धर्मवीर  दिघे यांच्या जीवनाविषयी ज्यादिवशी बोलेल त्यादिवशी राज्यात मोठा भूकंप होईल, असा इशारा शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मालेगाव येथील जाहीर सभेत दिला. 

शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादी व काँग्रेससोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रिपद मिळवले. मग विश्वासघात कोणी केला? बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली? मुंबई बॉम्बस्फोटाचे कनेक्शन असणाऱ्यांसोबत संबंध कोणी ठेवले? पन्नास आमदारांनी अन्यायाविरोधात बंडखोरी नाही तर उठाव, क्रांती केली आहे. याची जगातील ३३ देशांनी दखल घेतली आहे. एवढा मोठा उठाव का झाला याच्या मुळाशी जावे. आमच्यावर गद्दारीचा शिक्का मारला जात आहे. मात्र, जनतेने आम्हाला स्वीकारले असल्याचे या विराट गर्दीवरून दिसून येत आहे. आम्ही कोणाच्या विरोधात गेलो नाही. हिंदुत्व सोडलेले नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून निवडणूक लढवली होती. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचवण्यासाठी काम करीत आहोत. गेल्या अडीच वर्षांत सेनेच्या आमदारांचे अस्तित्व धोक्यात आले होते. त्यामुळेच टोकाची पावले उचलली असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. 

पोलिसांसमोर अनेक अडचणी आहेत. त्यांच्य जुन्या वसाहती आहेत. लिकेजेस आहेत, प्लॅस्टर पडत आहे. त्यांच्यासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करणार असल्याची घोषणाही एकनाथ शिंदे यांनी केली. 

टॅक्सी, रिक्षाचालकांसाठी महामंडळ
राज्यातील टॅक्सी व रिक्षाचालक, तसेच हॉकर्सधारक यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याचे काम युद्धपातळीवर सुरू केले जाईल. त्यासाठी त्याची जबाबदारी माजी कृषिमंत्री दादा भुसे व माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर देण्यात येईल. लोकांसाठी सरकार आहे.  पुढच्या निवडणुकीत शिवसेना भाजपचे दोनशे आमदार निवडून येतील, असा दावाही शिंदे यांनी केला.

जिल्हानिर्मितीसाठी शासन सकारात्मक
माजी कृषिमंत्री दादा भुसे व पदाधिकाऱ्यांनी सभेत मालेगाव जिल्हानिर्मितीची मागणी लावून धरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले होते.  यावर शिंदे यांनी जिल्हानिर्मितीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. मुंबईत  मंत्रालयात बैठक लवकरच घेऊन यावर निर्णय घेऊ असेही मुख्यमंत्र्यांनी 
सांगितले. 

देवेंद्र फडणवीसांना केले ‘पंतप्रधान’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलीस वसाहतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेताना एकनाथ शिंदे यांच्या तोंडी चुकून पंतप्रधान देवेंद्र फडणवीस असे नाव घेतले गेले. मात्र, लगेच त्यांनी आपली चूक सुधारली. यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल कमी करा, असे आपण डीजींना सांगितले असल्याचेही शिंदे म्हणाले.

Web Title: Don't take name of our parents; Otherwise earthquake! Eknath Shinde Warns shivsena's Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.