टेंशन नही लेनेका...आपण पासच; साडेचार लाख आजी-आजोबांच्या पेपर तपासणीचे काम सुरू
By अविनाश साबापुरे | Published: March 20, 2024 01:29 PM2024-03-20T13:29:45+5:302024-03-20T13:30:46+5:30
बोलीभाषेतील उत्तरेही ग्राह्य धरली जाणार असल्याचीही माहिती
अविनाश साबापुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: गत रविवारी राज्यात प्रौढ निरक्षरांची परीक्षा घेण्यात आली, तर परीक्षेनंतर लगेचच केंद्र शासनाने उत्तीर्णतेचे निकष शिथिल केले. १५० पैकी पूर्वी ५१ गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक होते; परंतु सुधारित निकषानुसार आता ४९.५ गुण मिळाले तरी उत्तीर्ण केले जाणार आहे. तसेच यापेक्षाही कमी गुण असणाऱ्या प्रौढांना अनुत्तीर्ण असा शेरा न देता ‘सुधारणा आवश्यक’ असा शेरा असलेले गुणपत्रक दिले जाणार आहे.
नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी १७ मार्च रोजी महाराष्ट्रात ३६ हजार परीक्षा केंद्रांवर झाली. या परीक्षेत तब्बल चार लाख ५६ हजार ७४८ प्रौढांनी हजेरी लावली. ही उपस्थिती उल्लास ॲपवरील नोंदणीच्या ७४.०३ टक्के होती. उत्तीर्णतेसाठी पूर्वी वाचन, लेखन व संख्याज्ञान या तिन्ही भागांमध्ये प्रत्येकी ५० पैकी १७ गुणांची अट देण्यात आली होती, तर एकूण १५० पैकी ५१ गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक होते. आता सुधारित निकषानुसार या तिन्ही भागांमध्ये प्रत्येकी ५० पैकी १६.५ गुण, तर एकूण ४९.५ गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक आहे. पेपर तपासणीचे काम सुरू झाले असून, सुधारित निकषाबाबत योजना शिक्षण संचालक डाॅ. महेश पालकर यांनी निर्देश जारी केले आहेत. सुधारित निकषानुसारच उत्तरपत्रिका तपासणी व निकाल जाहीर होणार आहे.
बोलीभाषेतील उत्तरेही ग्राह्य धरणार
- नवभारत साक्षरतेच्या परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासणी आणि गुणदानाबाबत केंद्र शासनाने सुधारित निकष दिले.
- त्यानुसार, प्रौढांनी प्रमाणभाषेऐवजी आपल्या बोलीभाषेत उत्तरे लिहिली असतील, तरी त्यांना गुणदान करण्याच्या सूचना आहेत.
- तसेच उत्तीर्ण होण्यासाठी ३३ टक्क्यांपेक्षा कमी गुण पडत असल्यास ५ ग्रेस गुण दिले जाणार आहेत.
- यानंतरही कोणी अनुत्तीर्ण होत असल्यास त्यांना ‘सुधारणा आवश्यक’ असे गुणपत्रक दिले जाणार आहे.
हे अभियान सन २०२७ पर्यंत चालणार आहे. त्यामुळे राज्यातील असाक्षरांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. आत्ताच्या परीक्षेत ज्यांना बसता आले नाही त्यांना येणाऱ्या सप्टेंबर किंवा मार्चच्या परीक्षेस बसता येईल.
- डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना)