"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 01:29 PM2024-11-17T13:29:02+5:302024-11-17T13:29:43+5:30
महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ येथील गांधी चौकात शनिवारी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
सावंतवाडी/दापोली : मला दहा दिवसांत जेलमध्ये टाकणार असे म्हणतात, पण मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका आणि हलक्यात पण घेऊ नका. मी संघर्षातून वर आलेलो आहे, जेलची भाषा माझ्यासाठी नवीन नाही, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेवर नाव न घेता टीका केली.
महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ येथील गांधी चौकात शनिवारी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार नारायण राणे, कुडाळ मालवणचे शिंदेसेनेचे उमेदवार नीलेश राणे, उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, कोकण आणि शिवसेनाप्रमुख यांचे वेगळे नाते होते. कोकणने शिवसेनाप्रमुखांना भरभरून प्रेम दिले. त्यामुळेच आम्ही खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. यासाठी मला मंत्री केसरकर यांनी खंबीर साथ दिली. माझ्या खांद्याला खांदा लावून काम केले.
गुवाहाटीत केसरकर यांनी घेतलेली भूमिका ही राजकारणातील सचिन तेंडुलकरसारखी होती. त्यामुळे केसरकर नक्कीच विजयाचा चौकार मारतील आणि सावंतवाडीचा कप जिंकून आणतील, असे शिंदे यांनी सांगितले.
आदित्य ठाकरेंवर टीका
आदित्य ठाकरे हे ओसाड गावचे युवराज आहेत. आदित्य ठाकरे ज्यांना काका म्हणतात त्यांचेच खाते त्यांनी काढून घेतले व बेईमानी केली, असा आराेप त्यांनी केला.
मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसशी अभद्र युती केली
- मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी जरी मुख्यमंत्री असलो तरी सर्वसामान्य माणूस आहे. गोरगरीब जनतेचे कल्याण हेच मी नेहमी डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिलो याचा मला अभिमान आहे.
- अडीच वर्षांपूर्वी मी जेव्हा सत्तेच्या विरोधात उठाव केला तेव्हा माझ्यावर अनेक आरोप झाले, पण मी घाबरलो नाही.
- २०१९ मध्ये महाराष्ट्राने युतीला कौल दिला, पण जनतेचा अपमान करत काहींनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसशी युती केली आणि जनतेचा अपमान केला. पण हे मला मान्य नव्हते, त्यामुळेच मी हा उठाव केला.
कोकणात रोजगार निर्माण करणार
कोकणच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना केली. या माध्यमातून रस्ते, पाखाड्या, धरणे यांची कामे करण्यात येतील. त्यामुळे कोकणचा बॅकलॉग भरून निघेल आणि मुंबई, पुण्याकडे कोकणातील तरुणांना रोजगारासाठी जाण्याची गरज लागणार नाही, असे एकनाथ शिंदेदापोलीमध्ये म्हणाले.
महायुतीचे उमेदवार आमदार योगेश कदम यांच्या प्रचारासाठी आझाद मैदानात जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना शिंदे यांनी कोयनेचे ६७ टीएमसी पाणी अडवून तीन जिल्हे सुजलाम-सुफलाम करण्यात येतील. केंद्रानेही याला मंजुरी दिली असून, येथील रोजगारात वाढ होईल, असे सांगितले.