इतिहास पूर्ण माहिती नसेल तर बोलू नये; छत्रपती संभाजीराजेंचा राज ठाकरेंना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 11:05 AM2022-05-03T11:05:57+5:302022-05-03T11:06:33+5:30
छत्रपतींचा वंशज या नात्याने ती समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली नाही हे खात्रीदायक सांगू शकतो असं संभाजीराजेंनी सांगितले.
नवी दिल्ली – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी औरंगाबादच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असा दावा केला. राज यांच्या दाव्यावर राज्यातील राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मंत्री जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ यांनी राज ठाकरे खोटे बोलत असून टिळकांनी समाधीसाठी पैसे गोळा केले परंतु समाधी बांधली नाही असं सांगितले आहे. आता याप्रकरणी छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे यांनी उडी घेतली आहे.
छ. संभाजीराजे(Sambhaji Chhatrapati) म्हणाले की, कुणीही जबाबदार व्यक्तीने इतिहास मांडतांना पुरावे धरून मांडावे. राज ठाकरेंनी जे विधान केले ते चुकीचे आहे. शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली नाही. इतिहासाबाबत १०० टक्के माहिती नसेल तर बोलू नये. छत्रपतींचा वंशज या नात्याने ती समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली नाही हे खात्रीदायक सांगू शकतो. महात्मा फुले यांनी समाधी शोधली. समाधी बांधण्याचं श्रेय शिवभक्तांचे आहे असं सांगत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
तर शरद पवार काय बोलतात, राज ठाकरे काय बोलतात यावर मी बोलणार नाही. महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे. शाहू महाराजांचा आहे. महात्मा फुले, आंबेडकरांचा आहे. महापुरुषांचा आदर्श घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. मी त्या दोघांचा प्रवक्ता नाही. त्यांच्या विधानावर मी का प्रतिक्रिया देऊ. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहे. त्यावर बोलेन असं सांगत संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी-मनसे या वादावर बोलण्यास नकार दिला.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीवादाचा आरोप करत ते छत्रपती शिवाजी महाराज यांचं कधी नाव घेत नाहीत असं म्हटलं. त्याचसोबत फुले-शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहेच परंतु त्याआधी तो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीय द्वेष वाढला. रायगडावरची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली हे शरद पवार कधी सांगत नाहीत असंही राज ठाकरेंनी दावा केला होता.
लोकमान्य टिळकांच्या कामाला कोणाची पावती नकोय
राज ठाकरेंच्या विधानावर आक्षेप घेत राष्ट्रवादी नेत्यांनी टिळकांनी पैसे गोळा केले परंतु समाधी बांधली नसल्याचं म्हटलं. त्यावर लोकमान्य टिळक यांच्या कामाला कोणाचीच पावती नको. कोणी ती द्यायचा प्रयत्नही करू नये. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांच्या हृयातीत बांधली गेली नसेल. मात्र समाधी व्हावी यासाठी त्यांनी कायकाय केले ते मराठी जनतेला आजही चांगलेच माहिती आहे, अशा शब्दात लोकमान्यांचे खापर पणतू कुणाल टिळक यांनी समाधीवरून सुरू असलेल्या राजकारणाला उत्तर दिले.