महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटतं का? राज ठाकरेंचं एका वाक्यात उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 03:11 PM2021-12-14T15:11:39+5:302021-12-14T15:12:10+5:30
मनसे प्रमुख राज ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर
औरंगाबाद: राज्यातील ठाकरे सरकार लवकरच पडेल असे दावे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून केले जातात. त्यासाठी वारंवार तारखा दिल्या जातात. याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही, असं राज म्हणाले. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
सध्या औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे सरकार पडेल असं वाटतं का, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर सत्तेत असलेल्या तीन पक्षांकडे पाहता हे सरकार पडेल असं वाटत नाही, असं उत्तर राज यांनी दिलं.
निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता
महापालिका निवडणुका आल्यानं राज ठाकरे बाहेर पडल्याची टीका विरोधक करतात. त्या टीकेला राज यांनी प्रत्युत्तर दिलं. निवडणुका येतच राहतात. त्यामुळे निवडणुकीसाठी बाहेर पडलो असं म्हणू शकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले. संभाजी नगरची निवडणूक वर्षभर पुढे जाण्याची शक्यता आहे. इतर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. पण त्याचीही खात्री देता येत नाही. त्याही निवडणुका सहा आठ महिने पुढे जाण्याची शक्यता आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचं प्रकरण सुरू आहे. केंद्रानं मोजायचं की राज्यानं मोजायचं यावरून टोलवाटोलवी सुरू आहे. कोणी सामोरं जायला तयार नाही. आमच्याकडे मतं मागायला येऊ नका, अशा पाट्या ओबीसींनी लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ओबीसींना सामोरं जाण्याची त्यांची हिंमत नाही. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे, असं राज यांनी म्हटलं.