विजय आपलाच होईल असं समजू नका...; देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना असं का म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 10:04 AM2023-12-31T10:04:24+5:302023-12-31T10:05:49+5:30
भाजपाच्या या बैठकीत पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांनी सहभाग घेतला होता.
मुंबई - Devendra Fadnavis on Election ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागलेत. त्यात भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाच्या विजयाबद्दल आत्मसंतुष्ट न होण्याचा आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुका गांभीर्याने घेण्याचा सल्ला फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. भाजपाचा विजय होणारच आहे हे समजून प्रत्यक्षात ग्राऊंड लेव्हलवर काम करणं थांबवू नका असा सूचक इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
भाजपाच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, सर्वसामान्य आणि गरिबांशी संवाद साधा जे भाजपाचे मतदार आहेत. आपला विजय निश्चित आहे असा समज करून प्रयत्न करणे सोडू नका. तिकीट कुणाला मिळेल याची चिंता करू नका. भाजपा कार्यकर्त्यांनी गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांवर लक्ष केंद्रीत करा. समाजातील या चार घटकांना नरेंद्र मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ झाला आहे. जातीबाबतचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. परंतु कार्यकर्त्यांनी जातीचा विचार करू नका असं त्यांनी सांगितले. भाजपाच्या या बैठकीत पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांनी सहभाग घेतला होता.
देवेंद्र फडणवीस असतील स्टार प्रचारक
भाजपाने निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून देवेंद्र फडणवीसांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. फडणवीसांची भाषण शैली, राजकीय कौशल्य यामुळे २०२४ च्या निवडणुकीत मतदारांना आकर्षिक करण्यात यश येईल. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या कामांबाबत जनतेसमोर फोकस केले जाईल. राज्यातील सर्व जिल्ह्यात फडणवीसांची रॅली होईल. येत्या फेब्रुवारीपासून मिशन महाराष्ट्र ४५ प्लस या अभियानासाठी ते राज्यभरात दौरा करतील आणि दिवसाला ३ सभा घेत लोकांना संबोधित करतील.
जागावाटप अंतिम टप्प्यात
राज्यात भाजपा-शिंदे गट-अजित पवार गट यांच्यातील जागावाटप फॉर्म्युला जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. महाराष्ट्रात भाजपा २६ जागांवर निवडणूक लढेल तर शिवसेना शिंदे गट-अजित पवार गट मिळून २२ जागांवर निवडणूक लढेल. राज्यात एकूण ४८ लोकसभा मतदारसंघ आहेत.
महाविकास आघाडीतही जागावाटपावरून रस्सीखेच
राज्यात काँगेस-उद्धव ठाकरे गट- शरद पवार गट यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. ठाकरे गटाने २३ जागा मागितल्या असून शरद पवार गटही १०-११ जागा लढण्यासाठी आग्रही आहे. त्यात काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वासोबतच आम्ही चर्चा करू असं ठाकरे गट सातत्याने सांगत आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेते काहीसे नाराज झाले आहेत. ठाकरे गट २३ जागा लढवणार तर आम्ही काय करायचे असा थेट सवाल काँग्रेस नेते विचारत आहे.