कुजबुज: मोठ्या लोकांचा भरोसा नाय; जे घडतेय ते नुसते मुकाटपणे पाहत राहायचे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 07:15 AM2023-05-04T07:15:58+5:302023-05-04T07:16:19+5:30

मोठे लोक काय करतील याचा भरवसा नाही. ते काय करू शकतात याचा अंदाज आपल्यासारखा सामान्य कार्यकर्ता लावू शकत नाही.

Don't trust older people; What was happening was just watching blindly | कुजबुज: मोठ्या लोकांचा भरोसा नाय; जे घडतेय ते नुसते मुकाटपणे पाहत राहायचे

कुजबुज: मोठ्या लोकांचा भरोसा नाय; जे घडतेय ते नुसते मुकाटपणे पाहत राहायचे

googlenewsNext

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीवरून प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. तत्पूर्वी अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवरून आधीच तर्कवितर्कांना उधाण आले असताना, आता शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयावरून पदाधिकारी अधिकच चिंताक्रांत झाले असताना ‘हे कधीतरी होणारच होते!’ अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. ‘मोठे लोक काय करतील याचा भरवसा नाही. ते काय करू शकतात याचा अंदाज आपल्यासारखा सामान्य कार्यकर्ता लावू शकत नाही. आपण काय, छोटे कार्यकर्ते आहोत. नेत्यांचे नसलो तरी पक्षाचे आहोत. या एकूणच वातावरणात आपले मात्र मरण होतेय. जे घडतेय ते नुसते मुकाटपणे पाहत राहायचे,’ अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये आहे. 

त्रिदंडी संन्यासाची पुन्हा आठवण

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर वेगवेगळ्या नेत्यांच्या अशा राजीनाम्याची चर्चा रंगली. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राजीनाम्याचा विषयही निघाला. उद्धव आणि राज ठाकरे यांना शिवसेनेत पुढे आणल्याने घराणेशाहीचा आरोप होऊ लागल्याने उद्विग्न होऊन बाळासाहेबांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यामुळे शिवसैनिकांना धक्का बसला. बाळासाहेबांनी नंतर राजीनामा मागे घेतला. त्यानंतर जेव्हा त्यांच्या राजकीय संन्यासाबाबत त्यांना प्रश्न विचारले, तेव्हा तो त्रिदंडी सन्यास असल्याचे ठाकरेंनी जाहीर केले. हवे तेव्हा संन्यास सोडून पुन्हा गृहस्थाश्रमात परत येण्याचा मार्ग खुला असल्याचा हा संन्यास. 

शिवसेनेतील शाहिस्तेखान कोण

अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने ‘जल्लोष’ या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्वपक्षातील आपल्या विरोधकांना खडे बोल सुनावले. सध्या शिवसेनेत अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर असे दोन गट सक्रिय आहेत. या दोन्ही गटांचे एकमेकांशी जमत नसल्याने वाळेकर यांनी विरोधकांना शाहिस्तेखानाची उपमा दिली. आम्हाला कमकुवत समजू नका, शिवाजी महाराज आपल्या मूठभर मावळ्यांसह लाल महालात जाऊन शाहिस्तेखानाची बोटे छाटू शकतात हे विसरू नका, असे म्हणत त्यांनी स्वपक्षातील आपल्या विरोधकांना खुले आव्हान दिले. वाळेकर यांच्या या विधानानंतर अंबरनाथच्या शिवसेनेत नेमका शाहिस्तेखान कोण, अशी चर्चा आहे.

Web Title: Don't trust older people; What was happening was just watching blindly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.