"उदय सामंतांवर झालेल्या हल्ल्याबाबत विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 08:20 AM2022-08-03T08:20:57+5:302022-08-03T08:21:24+5:30
पुण्यात राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या कारवर काही अज्ञातांनी मंगळवारी हल्ला केला.
पुण्यात राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या कारवर काही अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात कोणालाही दुखापत झालेली नाही. वेळीच सुरक्षारक्षक आणि महाराष्ट्र पोलिसांनी हल्लेखोरांना कारपासून दूर केल्याने आणि काहींना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. पुण्यातील कात्रज येथे सिग्नलवर सामंत यांची कार थांबली असताना रात्रीच्या सुमारास हा हल्ला झाला. दरम्यान, या घटनेवर शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली असून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका असं म्हटलं आहे.
“पुण्यात शिवसेनेची कात्रज याठिकाणी सभा झाली. त्या सभेच्या नंतर परतत असताना काही व्यक्तींनी माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीचा काच फोडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा दिसून येत आहे. बऱ्याच वाहिन्यावर चित्रीकरण गेलेला आहे. या सगळ्या घटनेच्या मध्ये पूर्णपणे मी स्पष्ट करू इच्छिते की, हे जे लोक आहेत ते कोण आहेत नक्की ते जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ते गृहीत धरणे की हे शिवसैनिकच आहेत किंवा कसं आणि तो हल्ला काही पूर्वनियोजित आहे की काय वगैरे अशा पद्धतीचे आरोप केले जातात ते योग्य नाही,” असे निलम गोऱ्हे म्हणाल्या.
“आमच्या सभेत आदित्य ठाकरेंनी विचार मांडलेले होते. उलट ज्यांना शिवसेनेची भूमिका पटत नाही त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावं असं म्हटलं होते. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं गाडी फोडण्याच्या घटनेशी या भाषणांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांच्या तपासात जे काही समोरी येईल त्याच्यावरती योग्य ती कारवाई पोलिसांनी करावी,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले उदय सामंत?
"झालेला प्रकार निंदनीय आहे. अशाप्रकारे हल्ले झाल्याने उदय सामंत थांबणार नाही. नाना भानगिरे यांच्याकडचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तानाजी सावंत यांच्या घरी जात होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचा ताफा निघून गेला आणि माझी कार सिग्नलवर थांबली. त्यावेळी माझ्या कारच्या बाजूला अचानक दोन गाड्या आल्या आणि त्यातून १२-१५ लोकं उतरली आणि त्यांनी माझ्या कार वर हल्ला केला. ते लोक शिवसैनिक नव्हते असं उत्तर शिवसेनेच्या विनायक राऊतांनी सांगितले. पण मी सांगतो की अशा हल्ल्यांनी उदय सामंत थांबणार नाही", असं उदय सामंत म्हणाले.