आई बहिणींवरून अपशब्द वापरू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तरुणांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 02:41 PM2024-01-12T14:41:29+5:302024-01-12T16:37:15+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक इथं २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

Don't use abusive language on mothers and sisters; Prime Minister Narendra Modi's appeal to the youth | आई बहिणींवरून अपशब्द वापरू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तरुणांना आवाहन

आई बहिणींवरून अपशब्द वापरू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तरुणांना आवाहन

नाशिक -  Narendra Modi in Nashik ( Marathi News ) स्थानिक उत्पादनाला चालना द्या, मेड इन इंडिया उत्पादनाला प्राधान्य द्या. कुठल्याही ड्रग्सच्या आहारी जाऊ नका. तुमच्या जीवनापासून ते दूर ठेवा. आई बहिणींवरून अपशब्द, शिवीगाळ केली जात असेल तर त्याविरोधात आवाज उचला. ते बंद करा. आपल्या देशातील प्रत्येक युवा त्यांची जबाबदारी निष्ठेने आणि सामर्थ्याने पूर्ण करेल हा विश्वास आहे. सशक्त भारताची जी ज्योत आम्ही पेटवली आहे ती अमृतकाळात अमरज्योत बनवा अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना आवाहन केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक इथं २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात PM नरेंद्र मोदी म्हणाले की, माझा सर्वात जास्त विश्वास भारताच्या युवा पिढीवर आहे. युवक ज्यारितीने देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडला जातोय त्यामुळे मी उत्साहित आहे. 'मेरा युवा भारत' संघटनेच्या स्थापनेनंतर हा पहिला युवा दिन आहे. संघटनेला स्थापन होऊन ७५ दिवसही झाले नाही तोवर आतापर्यंत १ कोटी १० लाख युवकांनी नोंदणी केली आहे. तुमचे सामर्थ्य, सेवाभाव देशाला, समाजाला नवीन उंचीवर घेऊन जाणार आहे. तुमचे प्रयत्न, मेहनत ही युवा भारताच्या शक्तीचा संपूर्ण जगात झेंडा रोवणार आहे. मी युवकांचे विशेष अभिनंदन करतो. 'माय भारत' नोंदणीत युवक-युवतींमध्ये स्पर्धा सुरू आहे. आमच्या सरकारला १० वर्ष पूर्ण होतायेत. या १० वर्षात आम्ही युवकांच्या पंखाना बळ देण्याचं काम केले आहे. शिक्षण, रोजगार, स्टार्टअप, कौशल्य विकास यासारख्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात आधुनिक इको सिस्टम तयार करत आहोत असं त्यांनी सांगितले. 

तसेच देशात नवनवीन आयआयटी, एनआयटी सातत्याने खुले होत आहेत. आज पूर्ण जग भारताला कौशल्य विकासाच्या दृष्टीने पाहतंय. परदेशात जाणाऱ्या युवकांसाठी सरकार प्रशिक्षण देत आहे. फ्रान्स, जर्मनी, यूके, इटली, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांसोबत भारत सरकारने करार केलेत त्याचा लाभ भारतीय युवकांना मिळत आहे. सरकार प्रत्येक क्षेत्रात ताकदीने काम करत आहे. एनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक सेक्टर विकसित करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. मागच्या सरकारच्या तुलनेत तिप्पटीने काम केले जात आहे. नवे महामार्ग, नव्या ट्रेन्स कुणासाठी बनतंय तर ते युवकांच्या विकासासाठी होतंय असंही मोदी यांनी म्हटलं. 

दरम्यान, भारतातील युवकांना सर्वात स्वस्त मोबाईल डेटा मिळत आहे. आज देशाचे भविष्य युवा आहे. युवा वर्ग मागे कधी राहत नाही. तो स्वत: नेतृत्व करायला पुढे येतो. तंत्रज्ञान क्षेत्रातही भारत जगाचे नेतृत्व करायला लागला आहे. मेड इन इंडिया, आयएनएस विक्रांत, चंद्रयान यासारखं यश आपण मिळवले आहे. आज भारतात मोठमोठ्या मॉलपासून रस्त्यावरील विक्रेत्यांपर्यंत यूपीआय पेमेंट घेतले जाते. अमृतकाळात युवकांना भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. आता आपल्याला केवळ समस्यांचे समाधान शोधायचे नाही तर आपल्याला नवे चॅलेंज निर्माण करायचे आहे. जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारताला बनवायचे आहे. आपल्याला सर्व्हिस, आयटी सेक्टरसह जगातील मॅन्युफॅक्चरिंग हब भारताला बनवायचे आहे. आपल्याला टार्गेट ठेऊन निश्चित काळात ते ध्येय गाठायचे आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना सांगितले. 

देशाच्या भविष्यासाठी मतदान करा

देशातील युवा पिढी गुलामीच्या प्रभावापासून मुक्त आहे. विकास आणि वारसा युवकांना हवा आहे. योग, आयुर्वेद ही भारताची ओळख आहे. स्वातंत्र्यानंतर  या गोष्टी विस्मरणात गेल्या परंतु आज जगात ही आपली ओळख बनतेय. मी जेव्हाही ग्लोबल नेत्यांना भेटतो तेव्हा मला त्यांच्यात मोठी आशा दिसते. भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत युवकांची भागीदारी जितकी जास्त असेल तितके राष्ट्रासाठी मोठे योगदान असेल. जर युवा सक्रीय राजकारणात आले तर घराणेशाही संपुष्टात येईल. घराणेशाहीच्या राजकारणाने देशाचे किती नुकसान झाले हे सगळ्यांना माहिती आहे. तुमची भूमिका मतांच्या माध्यमातून जाहीर करा. पहिल्यांदा मतदान करणारे युवा देशाच्या विकासात योगदान देऊ शकतात. देशाच्या भविष्यासाठी तुम्हाला मत देणे गरजेचे आहे. पुढील २५ वर्षाचा अमृतकाळ तुमच्यासाठी कर्तव्यकाळ आहे. 
 

Web Title: Don't use abusive language on mothers and sisters; Prime Minister Narendra Modi's appeal to the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.