दौंड-पुणे डेमू ‘ट्रॅक’वर येईना!
By admin | Published: April 3, 2017 01:37 AM2017-04-03T01:37:58+5:302017-04-03T01:37:58+5:30
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दौंड-पुणे लोकल सुरू झाली
दौंड-पुणे डेमू ‘ट्रॅक’वर येईना!
दौंड : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दौंड-पुणे लोकल सुरू झाली. मात्र दररोजच्या तांत्रिक बिघाडामुळे ती अद्याप ट्रॅकवर सुरळीत धावत नसल्याचे चित्र आहे. या लोकलला तांत्रिक अडचणींंनी घेरले आहे. उशिराने धावत असून, प्रशासनाचा ढिसाळपणादेखील याला कारणीभूत असल्याचे प्रवासी बोलत आहेत.
डेमू लोकलचे इंजिन बऱ्याचदा तांत्रिकदृष्ट्या बिघाड होत आहे. त्यामुळे वेळापत्रकही वारंवार बिघडत आहे. बुधवारी लोणी काळभोर रेल्वे स्थानकात इंजिनात बिघाड झाल्याने ती अर्धा तास रखडली. रात्री १२ वाजता दौंड येथून बारामतीकडे लोकल रवाना झाली. मात्र, बारामती स्थानकात बिघाड झाल्याने गुरुवारी सकाळी अन्य एक डिझेल इंजिन लावून दौंड रेल्वे स्टेशनला आणावे लागले. तसेच गुरुवारी सायंकाळी बारामतीहून दौंडकडे निघाली तेव्हा या लोकलला पाठीमागून अन्य एक डिझेल इंजिन लावलेली होते.
हे इंजिन दौंड रेल्वे स्थानकात काढण्यात आले. तेव्हा रेल्वे प्रशासनाला या इंजिनाबाबत विचारले असता, ते म्हणाले की, बारामती येथे मालगाडी घेऊन गेलेले इंजिन परत डेमूला जोडून दौंड येथे आणले अशी सारवासारव करीत रेल्वे प्रशासनाने वेळ मारून नेली.
मात्र, डेमू लोकलच्या
इंजिनात वेळोवेळी होणारा तांत्रिक बिघाड यामुळे डेमू लोकल बेभरवशाची झाल्याने प्रवाशांची कुचंबणा होऊ नये म्हणून या लोकलला अन्य एक डिझेल इंजिन लावलेले असते. (वार्ताहर)
>गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय
केडगाव : रेल्वे प्रशासनाने शुक्रवार (दि. ३१) रोजी पुणे ते दौंड दरम्यानच्या २ रेल्वेगाड्या रद्द केल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दौंडवरून पुण्याला जाणारी बारामती-पुणे पॅसेंजर (दुपारी १२.१० वाजता) व त्यानंतर दौंड-पुणे डेमू (दुपारी वेळ १२.५०) रद्द करण्यात आली. त्यानंतर दुपारी पुण्यावरून दौंडकडे येणारी पुणे -नांदेड पॅसेंजर (वेळ दुपारी २.२५) व पुणे-दौंड डेमू (वेळ दुपारी २.२० वाजता) या गाड्या रद्द करण्यात आल्या. भरीस भर म्हणजे त्यामुळे पुण्याला पहाटे जाणारी पुणे-सोलापूर पॅसेंजर २ तास उशिरा पुण्यात आली. याशिवाय सकाळी १०.३० वाजता पुण्याहून दौंडकडे ४० मिनिटे उशिरा धावली.