डोंगरगाव टोल बुथ हटविणार
By admin | Published: January 29, 2015 01:02 AM2015-01-29T01:02:42+5:302015-01-29T01:02:42+5:30
वर्धा मार्गावरील डोंगरगाव येथील बंद असलेल्या टोल नाक्याची इमारत (बुथ) हटविण्याबाबत प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिल्लीला पाठविला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी दिली.
जिल्हाधिकारी : प्रस्ताव दिल्लीला पाठविला
नागपूर : वर्धा मार्गावरील डोंगरगाव येथील बंद असलेल्या टोल नाक्याची इमारत (बुथ) हटविण्याबाबत प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिल्लीला पाठविला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात बुधवारी जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक झाली. यात उद्योजकांकडून आलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ए.पी. धर्माधिकारी व उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वाडी ते हिंगणा औद्योगिक क्षेत्रात १ फेब्रुवारीपासून बससेवा सुरू केल्या जातील, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. डोंगरगावचा बंद असलेल्या टोल नाक्याची इमारत हटविण्याचा प्रस्ताव दिल्लीला पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जमीन अकृषक करण्यासाठी १८ प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागतात. ही प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शी केली जाईल. यासंदर्भात काही सूचना असल्यास त्याचे स्वागत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
हळदगाव खदान ते वर्धा रोड हा रस्ता खनिज निधीतून तयार करणे, बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात खंडित होणारा वीज पुरवठा, बुटीबोरी येथे ईएसआयसी हॉस्पिटल, टी पॉईन्टवर सिग्नलची व्यवस्था, वटेघाट व पोही येथे शासकीय जागा ताब्यात घेणे, उमरेड औद्योगिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, हिंगणा औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमण, बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील मद्य विक्री आदीबाबत चर्चा झाली. (प्रतिनिधी)