कोरोनावरील उपचारासाठी ‘रेमडेसिवीर’ची मात्रा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 12:11 AM2020-06-07T00:11:48+5:302020-06-07T00:12:12+5:30
१० हजार इंजेक्शन खरेदी करणार; राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी ‘रेमडेसिवीर’ची मात्रा लागू पडत असल्याने राज्य सरकार बांगलादेशकडून या ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स खरेदी करणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी टिष्ट्वटरवर दिली आहे. ‘रेमडेसिवीर’ हे इंजेक्शन अँण्टी व्हायरल असून ‘सार्स’ आजारासाठी ते उपयुक्त ठरल्याने कोरोनावरही ते उपयुक्त ठरू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेने सूचविले आहे. तसेच रेमडेसिवीर औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याचा दावा अमेरिकेकडूनही करण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही याआधी भारतात करोना रुग्णांवर रेमडेसिवीर औषधाची चाचणी केली जाणार असल्याचे म्हटले होते. प्रयोगशाळा, प्राणी आणि वैद्यकीय अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे या औषधाचे आशादायक परिणाम मिळाला आहेत. त्यामुळे राज्य सरकारने १० हजार इंजेक्शन व्हायल्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) या इंजेक्शनची खरेदी केली जाणार आहे. आतापर्यंत काही रुग्णांकडून हे इंजेक्शन वैयक्तीकरित्या खरेदी करून त्याचा वापर झाला आहे. मात्र सर्वसामान्य रुग्णांना ते घेणे परवडणारे नसल्याने शासनाने त्यांच्यासाठी हे इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. हे इंजेक्शन उपलब्ध झाल्यावर त्याच्या वापराबाबत प्रमाणीत पद्धत (एसओपी) तयार केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
चाचण्यांचे दर सात दिवसात निश्चित करणार
राज्यातील कोरोना चाचण्यांसाठी मान्यता प्राप्त असलेल्या प्रयोगशाळांचे कोरोना निदान चाचणी शुल्क निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने चार सदस्यांची समिती गठीत केली आहे. समितीमार्फत सात दिवसात दर निश्चित केले जातील, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. सध्या खासगी प्रयोगशाळांसाठी आयसीएमआरने ४५०० रुपये दर निश्चित केला आहे.