हायटेक बसस्थानकाला प्रतीक्षा डबल बेलची
By admin | Published: May 18, 2015 10:21 PM2015-05-18T22:21:52+5:302015-05-19T00:30:34+5:30
१७ कोटीचा प्रकल्प : श्रेयवादामुळे रत्नागिरी बसस्थानकाचे काम आठ महिने रखडलेलेच
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी बसस्थानक व व्यापारी संकुलाचे भूमिपूजन होऊन आठ महिने लोटले तरी अद्याप कामकाज रखडले आहे. नियोजित बसस्थानकाचा प्रकल्प १७ कोटीचा असून तत्कालिन पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा नारळ वाढविण्यात आला. मात्र राज्यातील सत्ता पालटली व श्रेयवादाच्या भोवऱ्यात रत्नागिरी बसस्थानकाचे काम रखडले आहे.रत्नागिरी बसस्थानक गेली ६६ वर्षे प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहे. रत्नागिरी विभागांतर्गत ७८४ गाड्या असून दररोज ९ हजार फेऱ्यांव्दारे २ लाख २५ किलोमीटर वाहतूक करण्यात येते. सव्वा लाख विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येते. बसस्थानक जुने असून सुरूवातीला आगार, कार्यशाळा बसस्थानक परिसरात कार्यरत होते. मात्र आगार व कार्यशाळेचे स्थलांतर झालेनंतर रत्नागिरी बसस्थानकांमध्ये रूपांतर करण्यात आले. आघाडी सरकारच्या कालावधी बसस्थानकास मंजुरी तर मिळाली. भूमिपूजनासाठीही वर्षभरानंतर मुहूर्त मिळाला. भूमिपूजन होऊन आता आठ महिने झाले तरी अद्याप कामकाजाचा मात्र कसलाच पत्ता नाही. वास्तविक रत्नागिरीचे बसस्थानक तीन मजली उभारण्यात येणार असून लिफ्ट असलेले राज्यातील पहिले बसस्थानक आहे. बसस्थानकाला मान्यता मिळाली असून निधीही मंजूर झाला आहे. ठेकेदारही नियुक्त करण्यात आला आहे. परंतु राज्यातील सत्तांतरानंतर मंजूर बसस्थानकाच्या कामाला हिरवा कंदिल दाखविण्याऐवजी श्रेयवादामुळे काम सुरूच झालेले नाही.भूमिपूजनावेळी प्रकल्प विकासक नंदकुमार शहा यांनी बसस्थानकाचे काम दोन वर्षात पूर्ण करण्याचे अभिवचन दिले होते. मात्र काम पूर्ण करण्याऐवजी ते सुरू होण्याच्या वादात रखडले आहे. नियोजित बसस्थानकामध्ये लांब पल्ल्याच्या व ग्रामीण गाड्यांसाठी १४ फलाट तर शहरी मार्गावरील १० फलाट बांधण्यात येणार आहेत. याच इमारतीमध्ये ३८ हजार चौरस फुटाचे व्यापारी संकुल उभारण्यात येणार असून, त्यातून महामंडळाला चांगले उत्पन्नही उभे करता येणार आहे.बसस्थानकामध्ये चालक - वाहक विश्रांतीगृह, स्थानक प्रमुख कक्ष, आगार व्यवस्थापक कक्ष, अधिकारी अतिथी गृह उभारण्यात येणार आहे. संकुलामध्ये तळमजल्यावर ५० हजार लीटरची पिण्याच्या पाण्याची टाकी व पहिल्या मजल्यावर २५ हजार लीटर पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. बसस्थानकामध्ये फळांचे स्टॉल, मनोरंजन हॉल, कृषी साहित्य विक्री केंद्र व तत्सम व्यावसायिकांसाठी गाळे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. अत्याधुनिक सेवा असलेला बसस्थानकाचा प्रकल्प १७ कोटीचा आहे. परंतु विकासकामे सुरू होण्यापूर्वीच वादामध्ये रखडल्याचे दिसून येत आहे.वास्तविक राज्यशासनाने काम तातडीने सुरू करणे अपेक्षित होते. नागरिकांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या शासनाने निराशा केल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांना २ ते ३ वर्षात काम पूर्ण होईल अशी अपेक्षा असताना जुन्या बसस्थानकाचे रखडलेले काम पाहण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)