नागपूरला दुहेरी मुकुट
By admin | Published: December 15, 2014 11:45 PM2014-12-15T23:45:52+5:302014-12-16T00:21:50+5:30
राज्य व्हॉलिबॉल स्पर्धा : पुरुष-महिला गटांत बाजी; मुंबई उपनगर, पुणे उपविजेता
कुरुंदवाड : येथील श्री स्पोर्टस् क्रीडा संस्थेने आयोजित केलेल्या ४६व्या राज्य व्हॉलिबॉल स्पर्धेत पुरुष-महिला गटांत नागपूरच्या संघांनी दुहेरी मुकुट पटकावत अजिंक्यपदावर नाव कोरले. पुरुष गटात मुंबई उपनगर संघ, तर महिला गटात पुणे संघ उपविजेता ठरला.
पुरुष गटानेही जिगरबाज खेळी करीत मुंबई उपनगराला २५-२०, २३-२५, २५-१९, २८-३० व १५-९ अशा सेटनी तीन विरुद्ध २ गुणांनी पराभूत केले. पहिला सेट नागपूर संघाने २५-२० अशा फरकाने जिंकला, तर दुसरा सेट मुंबई संघाने २५-२३ असा जिंकून गुणात बरोबरी साधली. नागपूर संघाने सौरभ लोकरे, नीलेश मते, एस. सहदेव. पी. बाला टंडन व जे. तिवारी यांच्या उत्कृष्ट खेळीने नंतरचे दोन्ही सेट अत्यंत चिकाटीने जिंकले, तर मुबंई उपनगरच्या कल्पेश पटेल, दिग्विजय पानसरे, दिग्विजय साळुंखे, अंकित चौधरी, जी. भडंगे यांनीही तितक्याच जोराने प्रत्युत्तर दिले. मात्र, नागपूरच्या सांघिक खेळीपुढे मुंबई उपनगरला हार पत्करावी लागली.
या अटीतटीच्या लढतीमुळे तब्बल अडीच तासांहून अधिक काळ सामना रंगला. या रंगलेल्या सामन्यामुळे मध्यरात्रीपर्यंतही स्टेडियममधील एकाही क्रीडाशौकिनाने जागा सोडली नाही. पुरुष गटात गतविजेत्या पुणे संघास तिसरे स्थान मिळाले.
महिला गटातील अंतिम लढतीतही नागपूर विरुद्ध पुणे यांच्या झालेल्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत नागपूर संघाने पुणे संघावर २०-२५, २५-१८, २५-१८ व २७-२५ अशा सेटने मात करीत विजय मिळविला. दोन्ही संघांनी प्रत्येक गुणासाठी पाठलाग केल्याने चार सेटवर तब्बल सव्वादोन तास सामना रंगला.
पुणे संघाच्या अनिता झाकरीस व अमिता झाकरीस या जुळ्या बहिणींनी सरस कामगिरी केली. त्यांना स्नेहा भगत, प्रियंका धोत्रे, प्रियदर्शनी कोकरे यांनी चांगली साथ दिली. मात्र, नागपूर संघाची नामांकित खेळाडू भाग्यश्री धार्मिक, लिफ्टर दिशा देवाळकर, सिमरन चौधरी यांच्या उत्कृष्ट सांघिक खेळापुढे पुणे संघाला नामोहरम व्हावे लागले. पुणे संघाने पहिला सेट २५-२० फरकाने जिंकला. मात्र, नागपूर संघाने चिवट खेळी करीत सलग तीनही सेट जिंकत विजेतेपद पटकाविले. सांगली संघास तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
विजयानंतर नागपूरच्या पुरुष व मुलींच्या संघांनी डॉल्बीच्या ठेक्यावर जल्लोष केला. यावेळी सामना संयोजन समितीने केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने मध्यरात्री शहर उजळून निघाले. या रोमहर्षक लढतींमुळे रविवारच्या मध्यरात्री कुरुंदवाड शहर व परिसरातील क्रीडाशौकीनांनी संपूर्ण मैदान फूलून गेले होते. विजेत्या संघांना माजी मंत्री सतेज पाटील, नगराध्यक्ष संजय खोत, मयूर दूध संघाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी श्री स्पोर्टस् अध्यक्ष जयराम पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र डांगे, सचिव बी. डी. सावगावे, प्राचार्य डॉ. सुनील चव्हाण, नगराध्यक्ष संजय खोत, बांधकाम सभापती वैभव उगळे, उपनगराध्यक्ष सुरेश कडाळे, राज्य व्हॉलिबॉल संघटनेचे सचिव बाबासाहेब सूर्यवंशी, प्रा. शरद पराडकर यांच्यासह श्री स्पोर्टस्चे पदाधिकारी, नगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
कुरुंदवाड येथे झालेल्या राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेतील राज्य अजिंक्यपद विजेतेपदाचे बक्षीस माजी मंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते स्वीकारताना नागपूर संघाचे खेळाडू.