मालगाडीचे डबल इंजिन घसरले
By admin | Published: February 27, 2017 12:45 AM2017-02-27T00:45:00+5:302017-02-27T00:45:00+5:30
मालगाडीचे डबल इंजिन (मल्टिपल इंजिन) शंटिंग करताना रुळावरुन घसरल्याची घटना पाचोरा रेल्वेस्थानकात रविवारी रात्री ११ वाजता घडली.
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. 27 - मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे डबल इंजिन (मल्टिपल इंजिन) शंटिंग करताना रुळावरुन घसरल्याची घटना पाचोरा रेल्वेस्थानकात रविवारी रात्री ११ वाजता घडली. यामुळे मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या पाच रेल्वे गाड्या पाच वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत.
ही मालगाडी पाचोरा रेल्वे स्थानकावर थांबून होती. गाडीला डबल इंजिन होते. शंटींग करताना हे दोन इंजिन एकाचवेळी रुळावरुन घसरले. सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही. घटना घडताच भुसावळ रेल्वे विभागाला याची माहिती देण्यात आली. तिथून एक पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
इंजिन घसरल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघातामुळे हावडा मेल बोदवड येथे, अमरावती एक्सप्रेस भुसावळ येथे, विदर्भ एक्सप्रेस वरणगावला, पंजाब मेल रावेर येथे तर पुण्याकडे जाणारी आझादहिंद एक्सप्रेस माहिजी (ता. पाचोरा) रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.