तीस मतदारांकडून ‘डबल गेम’

By admin | Published: December 31, 2015 11:35 PM2015-12-31T23:35:40+5:302016-01-01T00:07:45+5:30

विधान परिषद : दोघांकडूनही पैसे घेतल्याचा संशय; वसुलीची मोहीम सुरू

'Double Game' From Thirty Voters | तीस मतदारांकडून ‘डबल गेम’

तीस मतदारांकडून ‘डबल गेम’

Next


कोल्हापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता ज्यांनी दोन्हींकडून पैसे घेऊन एका उमेदवाराची फसवणूक केली, अशा ३० मतदारांवर दोन्ही उमेदवारांनी लक्ष केंद्रित केल्याचे समजते. त्यांच्यावर ज्यांना मतदान केलेले नाही, त्यांचे पैसे परत द्यावेत, असा दबाव आणण्याच्या हालचाली सुरू आहेत.
या निवडणुकीत ३८२ मतदार होते. त्यापैकी सतेज पाटील यांनी २३५ मतदारांना सहलीवर नेले होते. उर्वरित १४७ पैकी काहीजण सहलीवर गेले नव्हते, तर सुमारे शंभरहून अधिक मतदारांना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सहलीवर नेले होते. प्रत्यक्ष निकालात सतेज पाटील यांना २२० मते मिळाली व महाडिक यांना १५७ मते मिळाली. याचा अर्थ सतेज यांच्याकडील किमान १५ मतदारांनी महाडिक यांना मतदान केले आहे.
दोघा उमेदवारांकडून पैसे घेतले; परंतु एकालाच मतदान केले, असे किमान ३० मतदार असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आता वसुलीची मोहीम तीव्र करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्यांनी दोघांकडून पैसे घेऊन सतेज पाटील यांना मतदान केले, त्यांनी महाडिक यांचे पैसे परत द्यावेत व ज्यांनी महाडिक यांना मतदान केले, त्यांनी सतेज पाटील यांचे पैसे परत द्यावेत, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. निकालानंतर आता हे वसुलीचे कवित्व सुरू झाले आहे.
गडहिंग्लज परिसरात दुसरीच एक चर्चा सुरू आहे. त्या परिसरातील एका नेत्याने सदस्यांना देतो म्हणून एकत्रित रक्कम उचलली व त्यापैकी सदस्यांना कमी देऊन काही रक्कम स्वत:च खिशात घातल्याची चर्चाही सुरू झाली आहे. त्याशिवाय ज्या पाच मतपत्रिका बाद झाल्या, त्यामागील मेंदू कुणाचा, याचीही विचारणा होत आहे. दोघांकडून पैसे घेतल्याने मानसिक दडपणाखाली मतदान कुणाला द्यायचे, याविषयी संभ्रम तयार झाल्यावर काहींनी दुसरा-तिसरा पसंती क्रम देऊन मतदान केल्याचे पुढे आले आहे.

सतेज पाटील यांना शुभेच्छा देण्यास ‘अजिंक्यतारा’वर रीघ
कोल्हापूर : गुरुवारी दिवसभर सतेज पाटील यांच्या निवासस्थानी आणि ‘अजिंक्यतारा’वर शुभेच्छा देण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांची रीघ लागली. त्यामुळे आमदार पाटील दिवसभर कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यात व्यस्त राहिले.
बुधवारी विजयानंतर रात्री उशिरापर्यंत गर्दी कायम होती. गुरुवारी दुपारी दीड वाजेपर्यंत बावड्यातील निवासस्थानी, तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अजिंक्यतारा कार्यालयात पाटील यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. नगरसेवक, सभापती, जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांची भेट घेतली. तसेच सांगली, सातारा जिल्ह्यांतील काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांनी भेट घेऊन विजयाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा स्वीकारून केलेल्या सहकार्याबद्दल सतेज पाटील आभार मानत होते.


सतेज यांनी चक्रव्यूह भेदला : मुश्रीफ
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ (गोकुळ), राजाराम कारखान्यात सतेज पाटील यांचा पराभव झाला. महापालिका निवडणुकीतही ते एकाकीच लढले. त्यामुळे त्यांची अवस्था महाभारतातील अभिमन्यूसारखी झाली होती; परंतु या निवडणुकीत त्यांनी विजयश्री खेचून आणत हा चक्रव्यूह भेदल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
मुश्रीफ म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघपणे त्यांच्या पाठीशी राहिली. राजेंद्र पाटील-यड्रावकरांपासून ते राजू लाटकरांपर्यंत सर्व नेते त्यांच्या विजयासाठी राबले. घोडेबाजार टाळावा, यासाठी मी महाडिक यांना त्यांनी ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती करायला गेलो होतो; परंतु त्यांनी त्याचा गैरअर्थ घेतला. एकदा पाठिंबा दिल्यावर झोकून देऊन मदत करायची, असा माझा स्वभाव आहे. त्यामुळेच धनंजय महाडिक यांच्या निवडणुकीवेळी ते खासदार न झाल्यास मी राजीनामा देण्याची घोषणा केली होती.

कोरे-जयंत पाटील यांचे श्रेय
या निवडणुकीत विनय कोरे व प्रा. जयंत पाटील हे योद्ध्यासारखे राबले. तसेच प्रकाश आवाडे, संजय मंडलिक यांनी पाठिंबा दिल्याने विजय सोपा झाल्याचे मुश्रीफ म्हणाले.
पक्षश्रेष्ठी ठरवतील
या निवडणुकीत खासदार महाडिक यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याने त्यांच्याविरोधात काही कारवाई होणार का? अशी विचारणा मुश्रीफ यांना केली असता त्यावर त्यांनी त्याबद्दल पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील, असे उत्तर दिले.

‘टाईट फिल्डिंग’मुळेच गुलाल!
कोल्हापूर : मतदारांना खूश करणारे नियोजन आणि नेत्यांनी प्रत्येक टप्प्यावर बाळगलेली दक्षता, यामुळेच काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांचा विजय सोपा झाला. मतदानाच्या आदल्या रात्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, जनसुराज्यचे विनय कोरे व संजय मंडलिक यांनी सर्व मतदारांशी व्यक्तिगत भेटून केलेली विनंतीही तितकीच महत्त्वाची ठरली.
मैदान मारायचेच हे सतेज पाटील यांनी पक्के केले होते. त्यामुळे त्यांनी दोन्ही काँग्रेसचे मतदार अगोदर ताब्यात घेतले. कोरे यांचा पाठिंब्याचा निर्णय उशिराने झाला, कारण त्यांनी कुणाला पाठिंबा द्यायचा हा घोळ सुरू ठेवत मतदार अगोदर गोळा केले. हे सर्व २३५ मतदार त्यांनी १५ डिसेंबरपासूनच ताब्यात घ्यायला सुरुवात केली. एकदा मतदार ताब्यात आल्यावर त्यांचे मतपरिवर्तन करणे शक्य होते, हे गणित त्यामागे होते. या सर्वांना त्यांच्या सोयीनुसार वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती; शिवाय कुटुंबातील कोण सहलीवर न्यायचे असेल तर त्याचीही मुभा होती. त्यामुळे असे १८३ नातेवाईक सहलीवर गेले होते. हे सर्वजण दक्षिण भारत, दिल्लीसह देशाच्या विविध प्रदेशांत फिरत होते. त्यांच्या प्रत्येक वाहनांसोबत दोन केअर टेकर देण्यात आले होते. केअर टेकरचे काम करणारे सतेज पाटील यांचे निष्ठावंत व विश्वासू कार्यकर्ते होते. त्यातील अनेकजण कौटुंबिक आर्थिक स्थिती चांगली असणारे होते; तरीही मतदारांच्या बॅगा उचलणे, त्यांना हवी ती गोष्ट पहाटे तीन वाजता मागितली तरी आणून देणे, प्रसंगी अशी कामे त्यांनी केली. जराही चिडचिड करायची नाही, हे तुम्हाला
जमणार असेल तरच तुम्ही या लोकांसोबत जावा, अशा सक्त सूचना होत्या.
पुण्यात सगळ्या नेत्यांसमवेत सर्व मतदारांची जी बैठक झाली, ती महत्त्वाची ठरली. या बैठकीसाठी मतदारांची विमान प्रवासाची हौसही भागविण्यात आली. पुण्यात त्यांना तीन आलिशान हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. या ठिकाणी हसन मुश्रीफ यांनी गोडीगुलाबीने व त्यांच्या ‘स्टाईल’मध्ये तराटणी दिली. विनय कोरे यांनी या बैठकीत केलेले भाषण फारच प्रभावी होते. संजय मंडलिक यांनी नाताळचे उदाहरण दिले. इथे सतेज पाटील हेच सांताक्लॉज आहेत. त्यांनी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. आता तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिक राहा, असे त्यांनी बजावले होते.
दुसऱ्या दिवशी मतदारांना फेटे बांधताना कुणाचे तरी कान फुंकतील म्हणून कोल्हापुरातच फेटे बांधून तयार करून ते स्टीच करण्यात आले व कोल्हापूरजवळ आल्यावर त्यांना प्रत्येकाला हे तयार फेटे दिले. इतकी सारी दक्षता घेतल्यामुळेच फंदफितुरी झाली नाही व सतेज यांना गुलाल लागला.

Web Title: 'Double Game' From Thirty Voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.