मुंबईत डबल मर्डर

By admin | Published: December 14, 2015 03:03 AM2015-12-14T03:03:08+5:302015-12-14T03:03:08+5:30

कांदिवतील डहाणूकर वाडीतील नाल्यात शनिवारी सायंकाळी दोन बॉक्समध्ये तुकड्या-तुकड्यांमध्ये सापडलेल्या दोन मृतदेहांमुळे मुंबई हादरली. हे मृतदेह सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि शिल्पकार हेमा उपाध्याय

Double Murder in Mumbai | मुंबईत डबल मर्डर

मुंबईत डबल मर्डर

Next

मुंबई : कांदिवतील डहाणूकर वाडीतील नाल्यात शनिवारी सायंकाळी दोन बॉक्समध्ये तुकड्या-तुकड्यांमध्ये सापडलेल्या दोन मृतदेहांमुळे मुंबई हादरली. हे मृतदेह सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि शिल्पकार हेमा उपाध्याय (४२) यांच्यासह त्यांचे वकील अ‍ॅड. हरिश भंबानी (६५) यांचे असल्याचे रविवारी स्पष्ट झाले.
दोरीच्या सहाय्याने गळा आवळून दोघांचीही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुद्ध दुहेरी हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून, कांदिवली पोलिसांसह गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. या प्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. डहाणूकर वाडीत शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास एका महिलेचा आणि पुरुषाचा मृतदेह नाल्यात सापडला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. त्याच दरम्यान माटुंगा व सांताक्रुझ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या हेमा व भंबानीच्या मिसिंग तक्रारीमुळे या दोघांच्याही नातेवाईकांना बोलावूून घेतले. मृतदेहाची ओळख पटताच, कांदिवली पोलिसांनी दुहेरी हत्येसह पुरावा नष्ट करण्यासंदर्भातील गुन्हा दाखल केला.
पैशांच्या व्यवहारातूनच हत्येचा संशय
प्रसिद्ध चित्रकार चिंतन उपाध्याय याची पत्नी हेमा व त्यांचे वकील हरिश भंबानी यांची हत्या, पैशांच्या व्यवहारातून झाल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे. या दोघांचे मृतदेह नाल्यात फेकणाऱ्या टेम्पो चालकाने याचा खुलासा केल्याचे समजते. त्यानुसार या हत्येतील मुख्य आरोपीची ओळख पटली असून लवकरच त्याच्या मुसक्या आवळण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले. - आणखी वृत्त/२
कांदिवली पश्चिमच्या लालजीपाडा येथील नाल्यात बॉक्सेसमध्ये हेमा आणि हरिश यांचे मृतदेह सापडले. हे मृतदेह एका टेम्पो चालकाने नाल्यात टाकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या टेम्पो चालकानेच पोलिसांना ही माहिती दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
त्यानुसार, या बॉक्सेसमध्ये मृतदेह असल्याचे त्याला माहीत नसावे, असा अंदाज आहे. या माहितीमुळे या हत्याकांडातील मुख्य आरोपीची ओळख पोलिसांना पटली आहे. पोलिसांची दोन पथके
मुंबई तर उर्वरित एक
पथक मुंबई बाहेर त्याचा शोध घेण्यासाठी रवाना झाल्याचेही समजते.
अद्यापपर्यंतच्या चौकशीत पैशांच्या व्यवहारातूनच
हे हत्याकांड घडल्याचे
उघड होत असल्याचे
सूत्रांचे म्हणणे आहे. हेमाचा पती चिंतन याचा या हत्याकांडामध्ये काही सहभाग असल्याचे अद्याप निष्पन्न झालेले नाही. मुख्य आरोपीच्या अटकेनंतरच या सर्व प्रकरणाचा खुलासा होईल, असेही सूत्रांनी नमूद केले.
>>> साडेचोवीस तासांत काय घडले?
मुंबई : हेमा उपाध्याय आणि अ‍ॅड. भंबानी या दोघांचा शेवटचा संपर्क झाल्यापासून त्यांचा मृतदेह सापडेपर्यंत साडेचोवीस तासांचा कालावधी उलटला होता. या काळात काय झाले असावे, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अंधेरीतील लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये असलेल्या एका स्टुडिओत जाण्यासाठी हेमा या शुक्रवारी दुपारी घरातून बाहेर पडल्या. मात्र, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांनी घरातील नोकर हेमंत मंडलला फोन करून रात्री बाहेरच जेवून येणार असल्याचे सांगितले. मात्र, त्या घरी परतल्याच नाहीत.
हेमा यांचा फोन बंद येत असल्याने नोकराने हेमा यांच्या नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आणि पती चिंतन यांना फोन करून याबाबत विचारणा केली. हेमा घरी न परतल्याने त्याने सकाळी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली. हेमा हरवल्याची तक्रार सांताक्रुझ पोलीस ठाण्यात दाखल होत असतानाच, दुसरीकडे अ‍ॅड. हरिश भंबानी यांच्या मुलीने शनिवारी साडेअकराच्या सुमारास माटुंगा पोलीस ठाणे गाठून वडिल बेपत्ता असल्याची तक्रार दिली. या तक्रारीनुसार, एका केसबाबत हेमा यांना भेटण्यासाठी अंधेरी येथे जात असल्याचे सांगून वडील शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घराबाहेर पडले, असे म्हटले आहे. त्यानंतर दोघांचीही शेवटची भेट अंधेरी येथील लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील स्टुडिओमध्ये झाल्याचे समोर येत आहे. सीसीटीव्ही चित्रणामध्ये रात्री साडेआठ वाजता दोघे कारने बाहेर पडताना दिसले. शनिवारी सायंकाळी दोघांचेही मृतदेह पोलिसांच्या हाती लागले.
2013मध्ये त्यांनी कौटुंबिक न्यायालयात धाव घेत घटस्फोटासाठी अर्ज केला. चिंतनेने रस्त्यांवरील दोन भटक्या कुत्र्यांना घरी आणून ठेवले होते. त्याचा त्रास होऊ लागल्याने कुत्रे ठेवण्यास विरोध केला असता, चिंतनने या कुत्र्यांचे अश्लील चित्र बेडरूममधील भिंतीवर रेखाटले, असा आरोप त्यांनी केला होता.
2014 मध्ये याबाबत कौटुंबिक न्यायालयात चिंतनच्या बाजूने निकाल लागला. केवळ दारू पित असलेल्या फोटोवरून तो व्यसनी असल्याचे सिद्ध होत नसल्याचे सांगून, न्यायालयाने त्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले.
2015 फेब्रुवारी मध्ये हेमाने चिंतन विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. यावेळी अ‍ॅड. हरिश भंबानी तिच्या बाजूने केस लढत होते. यावेळी हेमाने चिंतनकडून जुहू येथील फ्लॅटसाठी केलेल्या खर्चासह साडेसोळा लाख रुपयांच्या पोटगीसह महिना १ लाख रुपये देण्याची मागणी केली होती. त्यामुळे या हत्येमागे कौटुंबिक वाद असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
भंबानीच्या मृतदेहाभोवती सेलोटेप : हात बांधलेल्या अवस्थेतीतील भंबानीच्या शरीरावर सेलोटेप चिकटवण्यात आली होती. सेलोटेपने पूर्ण शरीर झाकून त्यांचा मृतदेह एका बॉक्समध्ये बंद करण्यात आला. एका प्लॅस्टिक पिशवीचे आवरण घालून, तो या फेकण्यात आला होता.
घटनाक्रम
११ डिसेंबर २०१५
सायंकाळी ६.३० - वकील हरिश भंबानी यांनी हेमा यांना भेटण्यासाठी घर सोडले
त्यानंतर थेट अंधेरी येथील लक्ष्मी इंडस्ट्रीज स्टुडिओमध्ये हेमा आणि भंबानी भेटले
१२ डिसेंबर २०१५
सकाळी ११.३० - माटुंगा पोलीस ठाण्यात भंबानी हरविल्याची तक्रार
सकाळी ११ वाजता - सांताक्रुझ पोलीस ठाण्यात हेमा हरविल्याची तक्रार
सायंकाळी ७ वाजता - डहाणूकर वाडीतील नाल्यात दोघांचाही मृतदेह सापडला
१९९८ : हेमा आणि
चिंतनचा प्रेमविवाह
२०१० : हेमाने चिंतन विरोधात अत्याचाराची पहिली तक्रार दाखल केली
२०१३ : हेमाने कौटुंबिक न्यायालयात धाव
२०१४ : चिंतन उपाध्यायच्या बाजूने न्यायालयाचा निकाल
२०१५ : हेमाचा उच्च न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज
१२ डिसेंबर २०१५ : हेमासह वकील भंबानीची हत्या.
बाहेरच जेवणाचा बेत...
हेमा यांनी शुक्रवारी साडेसहाच्या सुमारास मला फोन केला होता. मी रात्री बाहेरच जेवून येईन, त्यामुळे तू जेवून घे, असे त्यांनी मला सांगितले. रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाही. त्या घरी न परतल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी सांताक्रुझ पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली.
- हेमंत मंडल, हेमा उपाध्याय यांचा नोकर
हत्येपूर्वी मृत व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. माटुंगा आणि सांताक्रुझ पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारींची माहिती घेत, गुन्ह्यांबाबत महत्त्वाचे तपशील आणि पुरावे गोळा करण्यात येत आहेत.
- फत्तेसिंग पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त
>>>>> गाजलेली दुहेरी हत्याकांडे
टिंगल टवाळीतून हत्या... २९ मे २०१३- शहबाज अहमद शेख आणि माझ अहमद शेख याची वडाळा मध्ये हत्या करण्यात आली होती. न्यानसिंग ठाकूर नामक तरुणाला घटनेच्या दोन दिवसांनी अटक केली. ठाकूर याच्या आईने दुसरा विवाह केला, म्हणून शेख बंधुंकडून होत असलेल्या टिंगल टवाळीतून त्यांची हत्या करण्यात आली होती.
आजी-नातवाची हत्या : ३ जून २०११- सायन कोळीवाडा परिसरात राहात असलेल्या रंजना नागोडकर (५३) आणि वैष्णवी रायलकर (३) यांची हत्या करण्यात आली होती. पाच महिन्यांनंतर हत्येचा उलगडा होऊन लुटीच्या उद्देशाने शेजारी राहणाऱ्या विशाल श्रीवास्तव (२१) ने ही हत्या केल्याचे उघड झाले. या प्रकरणी अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांनी दुहेरी हत्येच्या गुन्ह्यात श्रीवास्तवला अटक केली होती.

Web Title: Double Murder in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.