भूसंपादनाचा दुप्पट मोबदला

By admin | Published: May 23, 2017 04:23 AM2017-05-23T04:23:54+5:302017-05-23T04:23:54+5:30

महापारेषणतर्फे राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या ६६ के.व्ही. ते १२०० के.व्ही. च्या मनोऱ्यासाठी भूसंपादनाचा मोबदला रेडिरेकनर दराच्या दुप्पट दिला जाणार आहे

Double reward for land acquisition | भूसंपादनाचा दुप्पट मोबदला

भूसंपादनाचा दुप्पट मोबदला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापारेषणतर्फे राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या ६६ के.व्ही. ते १२०० के.व्ही. च्या मनोऱ्यासाठी भूसंपादनाचा मोबदला रेडिरेकनर दराच्या दुप्पट दिला जाणार आहे. तसेच, शेतावरून जाणाऱ्या वीज वाहिन्यांखालील (तारा) जमिनीसाठीही मोबदला दिला जाईल.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या संबंधीच्या धोरणास मंजुरी देण्यात आल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आतापर्यंत मनोऱ्याखालील जागेच्या मूल्याच्या २५ ते ६५ टक्के एवढी नुकसान भरपाई जमिनीच्या प्रकारनुसार- कोरडवाहू, ओलीत, बागाईत, अकृषक जमिनीसाठी देण्यात येत होती. नवीन धोरणामुळे शेतकऱ्यांना मनोऱ्याने व्याप्त जमिनीच्या त्या-त्या भागातील रेडीरेकनर प्रमाणे होणाऱ्या मूल्यांकनाच्या दुप्पट मोबदला मिळणार आहे. तसेच वाहिन्यांखालील जमिनीचा मोबदला ही मिळणार आहे. सध्या वाहिन्यांच्या पट्टयाखालील जमिनीचा मोबदला देण्यात येत नव्हता.नव्या धोरणानुसार तारांखालील जागेचा मोबदला दिला जाणार आहे. शहरी भागात मोबदला देण्यासाठी अतिउच्चदाब वाहिन्यांबाबत केंद्र सरकारच्या स्तरावर समिती स्थापन करण्यात आली. मुंबई महापालिका व उपनगरीय क्षेत्रातील जमिनीचे दर जास्त असल्यामुळे सुधारीत नवीन धोरण मुंबई व उपनगरे वगळून लागू राहील. अतिउच्च दाब मनोऱ्याने व्याप्त वाहिनीच्या खालील जमिनीचा मोबदला ठरवण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात येईल. भूमि अभिलेख उपअधिक्षक व तालुका/जिल्हा कृषी अधिकारी व पारेषण कंपनीचे प्रतिनिधी या समितीचे सदस्य राहतील.

सातबारा उताऱ्यावर मोबाईल मनोऱ्याची नोंद जमिनीचा मोबदला शेतकऱ्यास मान्य नसेल तर तो जिल्हाधिकाऱ्याकडे अपिल करु शकेल.दिलेल्या मोबदल्याची नोंद सातबाराच्या उताऱ्यावर केली जाईल. मोबदल्याची रक्कम समान दोन टप्प्यात देण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील मोबदला मनोरा पायाभरणीनंतर व दुसऱ्या टप्प्यातील मोबदला मनोरा उभारणीनंतर देण्यात येईल. तारेखालील जमिनीचा मोबदला प्रत्यक्ष वाहिनी उभारल्यानंतर देण्यात येईल. मनोरा-पायाभरणी, वाहिनी उभारताना पिकांचे व फळझाडांचे नुकसान झाल्यास दोन टप्प्यात मोबदला देण्यात येईल. ज्या जमिनीवरुन फक्त तारा गेल्या अशा ठिकाणी तारेखालील जमिनीचा मोबदला प्रत्यक्ष वाहिनी उभारल्यानंतर देण्यात येईल. जमिनीच्या मालकाचा बदल झाल्यास नवीन मालक पात्र ठरणार नाही.

Web Title: Double reward for land acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.