जीएसटीपूर्वी दस्त नोंदणी दुप्पट
By admin | Published: July 3, 2017 04:37 AM2017-07-03T04:37:33+5:302017-07-03T04:37:33+5:30
वस्तू व सेवा कर प्रणाली (जीएसटी) लागू होणार असल्याने अनेकांनी घर, जमीन खरेदी-विक्रीला प्राधान्य दिले. त्यामुळे जूनच्या शेवटच्या १५ दिवसांत खरेदी-विक्रीचे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वस्तू व सेवा कर प्रणाली (जीएसटी) लागू होणार असल्याने अनेकांनी घर, जमीन खरेदी-विक्रीला प्राधान्य दिले. त्यामुळे जूनच्या शेवटच्या १५ दिवसांत खरेदी-विक्रीचे अनेक व्यवहार झाल्याचे दिसून आले. काही महिन्यांपासून रिकाम्या पडलेल्या सदनिकांची विक्री झाल्याने बांधकाम व्यावसायिक समाधानी झाले तर दुसरीकडे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात दस्त नोंदणीचा आकडा दुप्पट झाल्याची माहिती समोर आली.
जीएसटी लागू होण्याच्या एक दिवस आधी राज्यात ८ हजारांपेक्षा जास्त दस्त नोंदणी झाली. शहरातील नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून नोंदणीसाठी चांगलीच गर्दी केली होती. जीएसटी लागू होण्यापूर्वी सदनिका, घर आणि खरेदी-विक्री व्यवहाराबाबत दस्त नोंदणी केलेले जीएसटी करप्रणालीत येणार नसल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, बांधकाम व्यावसायिकांची पूर्ण रक्कम दिलेली नसेल तर नंतर जीएसटीनुसार १२ टक्के कर द्यावा लागेल. बांधकाम व्यावसायिकांच्या हाती रक्कम मिळाल्याचा दिवस त्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
जीएसटी लागू होण्यापूर्वी राज्यभरात ८ हजार ६४ दस्तांची नोंदणी झाली असून त्यापोटी ५८.७५ कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात ६ लाख १५ हजार ५५७ दस्त नोंदणी झाली आहे. घरे, सदनिका खरेदी-विक्री व्यवहाराबाबत ३० जूनपूर्वी दस्त नोंदणी केलेले जीएसटी कर प्रणालीत येणार नसल्याचेही राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क महानिरिक्षक अनिल कवडे यांनी सांगितले.