डोंबिवलीत वायुगळतीची नऊ कामगारांना बाधा
By admin | Published: September 21, 2016 03:45 AM2016-09-21T03:45:36+5:302016-09-21T03:45:36+5:30
रामचंद्रनगर परिसरातील रहिवाशांना प्रदूषणाचा त्रास झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी हिंदुस्थान मोनोमर्स कंपनीत वायुगळती झाली.
डोंबिवली : नाल्यात सोडलेल्या रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे रामचंद्रनगर परिसरातील रहिवाशांना प्रदूषणाचा त्रास झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी हिंदुस्थान मोनोमर्स कंपनीत वायुगळती झाली. परिसरातील अन्य कंपन्यांमधील नऊ कामगारांना त्याची बाधा झाली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, कंपन्या बंद असल्या तरीही वायुप्रदूषण होत असल्याने कंपन्या छुप्या पद्धतीने सुरू आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्व कंपन्यांची एकदा तरी पाहणी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
डोंबिवली औद्योगिक पट्ट्यातील फेज दोनमध्ये असलेली हिंदुस्थान मोनोमर्स कंपनी कच्च्या मालाचे उत्पादन करते. या कंपनीत ४० कामगार विविध शिफ्टमध्ये काम करतात. मात्र रविवारी सुटीमुळे ही कंपनी बंद होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या कंपनीत डायमिथाईल सल्फेट हे रसायन होते. दोन पाइपमधील गॅसकटरमधून रसायनाची गळती झाली. त्यामुळे आजूबाजूला सुरू असलेल्या कंपनीतील नऊ कामगारांना त्याची बाधा झाली. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने इतर कामगारांनी त्यांना त्वरित खाजगी रुग्णालयात दाखल केले. रविवारी तीन कामगारांना प्रथमोपचार करून तत्काळ घरी सोडण्यात आले. तर इतर सहा कामगारांना मंगळवारी सकाळी सोडण्यात आले. मॅथेनॉल आणि सल्फर डायआॅक्साइड या रसायनांचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आल्याने त्याची बाधा झाली. या रसायनाचा परिणाम त्वरित दिसून येत नसला तरी १० तासानंतर त्याचे दुष्पपरिणाम जाणवतात. हे रसायन अतिघातक नसल्याने केवळ काही तासांसाठी त्याचा त्रास जाणवतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>कंपनीला बंदची नोटीस नाही
प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोंबिवली व अंबरनाथ औद्योगिक विभागातील १४२ कंपन्यांना बंदची नोटीस बजावली आहे. त्यानुसार डोंबिवलीतील ८६ रासायनिक कंपन्या बंद आहेत. मात्र, या कंपनीचा त्यात समावेश नाही. तसेच या कंपनीतील रसायन हे उघड्या नाल्यांमध्ये सोडले जात नाही. ते शून्य लिक्विड डिस्चार्ज अर्थात रसायनावर प्रक्रिया करून ते जागीच नष्ट केले जाते. त्यामुळे या कंपनीला बंदीची नोटीस नव्हती.