दुष्काळग्रस्तांचे परीक्षा शुल्क माफ
By admin | Published: December 24, 2015 02:20 AM2015-12-24T02:20:18+5:302015-12-24T02:20:18+5:30
राज्यातील पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
पुणे : राज्यातील पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत महाराष्ट्र राज्य माध्यमिक
व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या साडेचार लाख
विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ झाले आहे.
शासनाने पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या गावांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार संबंधित गावांतील दहावीतील मुलांचे परीक्षा अर्ज भरून घेताना त्यांच्याकडून शुल्क आकारण्यात आले नाही. राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे म्हणाले, आतापर्यंत ४ लाख ४९ हजार ३७७ विद्यार्थ्यांना शुल्क आकारण्यात आले नसल्याची माहिती राज्यातील सर्व विभागीय मंडळांकडून कळविण्यात आली आहे. त्यात नाशिक, औरंगाबाद व लातूर विभागातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून मुंबई, कोकण विभागातील एकाही विद्यार्थ्याचे शुल्क माफ झाले नाही.
नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या नागपूर ग्रामीण मधील १११ गावांमधील १३१ विद्यार्थ्यांचे आणि गडचिरोली जिल्ह्णातील ३६७ गावांमधील १ हजार ९०७ विद्यार्थ्यांचे शुल्क माफ झाले आहे. वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्णात एकही गाव दुष्काळग्रस्त नसल्याने येथील विद्यार्थ्यांना शुल्क माफी मिळाली नाही.
मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील म्हणाले, अमरावती विभागातील बुलढाणा, अकोला व यवतमाळ जिल्ह्णात दुष्काळग्रस्त गावे आहेत. मात्र, या जिल्ह्णातील शाळांपर्यंत परीक्षा शुल्क माफ केले जाणार असल्याची माहिती न पोहचल्यामुळे या विभागातील सर्व विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारणी करण्यात आली आहे.
परंतु, जिल्हा प्रशासन स्तरावर
हा प्रश्न सोडविला जाणार असल्याचेही मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)