मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 12:16 AM2024-10-09T00:16:57+5:302024-10-09T00:18:02+5:30

शासन ही योजना कोणत्याही अडचणींशिवाय पुढील पाच वर्ष चालू ठेवणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Doubts from Mva about duration of Ladaki Baheen Yojana Devendra Fadnavis reaction | मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...

मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...

Devendra Fadnavis ( Marathi News ) : राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. राज्यातील २ कोटी २० लाख बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा झालेले आहेत. महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार प्रथम या शासनाने केलेला असून त्याचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत असल्याने त्यांना एक प्रकारचा आनंद व समाधान मिळत आहे. हा आनंद व समाधान टिकून राहण्यासाठी शासन ही योजना कोणत्याही अडचणींशिवाय पुढील पाच वर्ष चालू ठेवणार आहे," अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ वचनपूर्ती सोहळा अंतर्गत होम मैदान येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री  फडणवीस मार्गदर्शन करत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, संजय शिंदे, शहाजी बापू पाटील, राम सातपुते, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महापालिका आयुक्त शितल उगले तेली,  सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे डॉ. अमोल शिंदे, ज्योती वाघमारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना जून जुलैचे प्रतिमाह पंधराशे रुपये प्रमाणे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत. भाऊबीज नोव्हेंबर महिन्यात येत असल्याने राज्य शासनाने विचार करून याच महिन्यात भाऊबीज म्हणून थेट नोव्हेंबर महिन्याचे पैसेही बहिणींच्या बँक खात्यात जमा केलेले आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने देशभरात लखपती दीदी ही योजना सुरू केलेली असून या योजनेच्या माध्यमातून लाखो महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून लखपती होत आहेत. त्याच धर्तीवर राज्य शासनही महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने योजना राबवत असून पहिल्या टप्प्यात राज्यात २५ लाख लखपती दिदी तयार करण्यात येणार आहेत, तर या पुढील राज्यात १ कोटी लखपती दीदी तयार करून प्रत्येक महिला वर्षाला किमान एक लाख रुपये स्वतः कमवतील यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
 
"राज्यातील सर्व उपसा योजनांचे सौरऊर्जीकरण करण्यात येणार असून यासाठी ३ हजार ३६६ कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपंपासाठी दिवसा वीज देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे राज्यातील सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरून सौर पंप बसवून देण्यात येणार असल्याने पुढील २५ वर्ष विजेचा खर्च शेतकऱ्यांना येणार नाही. तसेच मुलींना उच्च शिक्षणात शंभर टक्के फी माफी, लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलगी जन्मताच मुलीच्या नावावर शासन पैसे टाकत आहे, एसटी बस मध्ये महिलांना  तिकीटामध्ये ५० टक्के सवलत देण्यात आलेली आहे," अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Web Title: Doubts from Mva about duration of Ladaki Baheen Yojana Devendra Fadnavis reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.