अनैतिक संबंधातून विधवेचा विळ्याने खून
By admin | Published: December 30, 2016 09:54 PM2016-12-30T21:54:29+5:302016-12-30T21:54:29+5:30
हिवरासंगम येथे शुक्रवारी उघडकीस आली. वंदना उर्फ अनिता अशोक चवरे (३०) असे मृताचे नाव आहे.
ऑनलाइन लोकमत
हिवरासंगम, दि. 30 - अनैतिक संबंधाच्या कारणावरून विधवा महिलेचा विळ्याचे वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना महागाव तालुक्याच्या हिवरासंगम येथे शुक्रवारी उघडकीस आली. वंदना उर्फ अनिता अशोक चवरे (३०) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी तिचा दीर पिंटू उर्फ प्रकाश दगडू चवरे व सासू सिंधूबाई दगडू चवरे यांना महागाव पोलिसांनी खुनाच्या आरोपात अटक केली. गुरुवारी रात्रीच अनिताचा खून करण्यात आला.
शुक्रवारी पहाटे अनिताचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत तिच्याच अंगणात आढळून आला. तिच्या अंगावर विळ्याचे वार करण्यात आले होते. हा विळा तिच्या मृतदेहाशेजारीच पडून होता. अनिताचा दीर प्रकाश चवरे याने महागाव पोलिसांकडे खुनाच्या या घटनेची सकाळीच फिर्याद नोंदविली. शिवाय या खूनप्रकरणी अनिताचे अनैतिक संबंध असलेल्या गावातीलच बंडू वारंगे याच्यावर संशय व्यक्त केला. महागावचे ठाणेदार करीम मिर्झा यांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा रक्ताचे डाग प्रकाशच्या घरापर्यंत आढळून आले. त्यामुळे पोलिसांना प्रकाशवर संशय बळावला. अखेर बाजीराव दाखविताच प्रकाशने गुन्हा कबूल केला आणि खुनाच्या या प्रकरणात मृताच्या प्रियकराला फसवू पाहणारा फिर्यादी दीरच आरोपी निघाला. पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल (आयपीएस) यांनीही घटनास्थळी भेट दिली.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, अनिता चवरे हिच्या पतीने पाच वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. सासू सोबत पटत नसल्याने ती मुलगा देवानंद (९) व मुलगी ऋतुजा (७) यांच्याासह शेजारीच वेगळी राहत होती. त्यांच्या बाजूलाच सासू व दीर राहत होते. अनिताचे गावातीलच बंडू काळूराम वारंगे याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा सासूला संशय होता. याच कारणावरून सासू-सुनेचे नेहमी भांडण व्हायचे. सासूने या अनैतिक संबंधाबाबतचा संशय तंटामुक्त समितीकडे लेखी स्वरूपात व्यक्त केला होता. दरम्यान गुरुवारच्या रात्री अनिताचा खून करण्यात आला. तिची मुलगी या खुनाची साक्षीदार असावी, असा पोलिसांना संशय आहे. सकाळी खून झाल्यानंतर अवघ्या काही तासातच तपास चक्रे फिरवून महागावचे ठाणेदार करीम मिर्झा यांनी खुनाचा छडा लावला आणि दोनही आरोपींना गजाआड केले. सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी, फौजदार पावरा, बिट जमादार देवाशिष पवार, पोलीस कर्मचारी युवराज जाधव, प्रशांत, सुरेश पवार, महिला पोलीस शिपाई किरणताई आडे आदी या तपासात मदत करीत आहे.
कुटुंबाची वाताहत
सहा ते सात सदस्यांचे कुटुंब असलेल्या चवरे परिवाराची वाताहत झाली आहे. मृतक अनिताचा सासरा दगडू चवरे यांनी चार वर्षांपूर्वी घरातच गळफास लावून आत्महत्या केली होती. तर तिचा पती अशोक याने अंगावर रॉकेल ओतून तुराटीच्या गंजीवर बसून स्वत:ला जीवंत जाळून घेतले. आता अनिताचाही खून झाला आणि त्यात सासू व दीर अटकेत आहेत. त्यामुळे अनिताच्या चिमुकल्या मुला-मुलीची वाताहत झाली आहे.