बडेजावपणातून डोकावतोय आजही ‘हुंडा’

By admin | Published: May 5, 2017 02:29 AM2017-05-05T02:29:59+5:302017-05-05T02:29:59+5:30

लग्नापूर्वी अथवा लग्नानंतर हुंड्यासाठी विवाहितांचा छळ करण्याचा प्रकार कमी होत नसून वाढतच असल्याचे सामाजिक वास्तव पुढे येत

Dowry continues to be 'dowry' | बडेजावपणातून डोकावतोय आजही ‘हुंडा’

बडेजावपणातून डोकावतोय आजही ‘हुंडा’

Next

महेंद्र कांबळे / बारामती
लग्नापूर्वी अथवा लग्नानंतर हुंड्यासाठी विवाहितांचा छळ करण्याचा प्रकार कमी होत नसून वाढतच असल्याचे सामाजिक वास्तव पुढे येत आहे. काही दिवसांपूर्वी मराठवाडा येथील एका मुलीने हुंडा देऊ शकत नाही, बापाला त्यासाठी कर्ज काढावे लागू नये, यासाठी विहीरीत जीव दिला. या घटनेने राज्य हदरले. हुंडा घेणे आणि देणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, पारंपरिक रीतीरिवाज, बडेजावपणा मिरवण्याची सवय असलेल्या मंडळींची मानसिकता अद्याप बदलायला
तयार नाही.
सामाजिकदृष्ट्या हुंड्यासाठी होणारा स्त्रियांचा छळ ही बाब नक्कीच संवेदनशील आहे. आता यावर तरुणांनी चर्चा करण्यापेक्षा व्यापक मोहीम हाती घेतली पाहिजे, असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.हुंडा प्रथेच्याविरोधात अनेक सामाजिक संघटनांनी आतापर्यंत आवाज उठविला आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातदेखील महापुरुषांनीदेखील या प्रथेला छेद देण्याचा प्रयत्न केला. परंतु, २१ व्या शतकातदेखील विवाहितांचा हुंड्यासाठी छळ केल्याच्या घटना कमी होत नसल्याचे बारामती पोलीस ठाण्यातून माहिती घेतली असता  दिसून येते.
बारामती शहरातील युवक विपुल पाटील यांची ‘कुणाचा बैल विकायचा आहे का...’ ही सोशल मीडियावरील पोस्ट सर्वाधिक चर्चेची ठरली. पाटील यांनी तयार केलेली पोस्ट अशी आहे. काही दिवसांपूर्वी एका कृषिकन्येने आपल्या शेतकरी बापाला हुंड्याची झळ बसू नये, यासाठी आत्महत्या केली. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपसारख्या सोशल मीडियावर अनेकांचे संदेश वाचले. अनेकांनी त्यामध्ये हळहळ व्यक्त केली आहे, हे वाचून मनाला एक प्रकारची झिरड आली.
महाराष्ट्रात दरवर्षी हजारो बैल विकायला निघतात. आई-बाप आपल्या दिवट्याला सजवून धजवून लग्नाच्या बाजारात उभा करतात. त्यांचे सरासरी दर पुढीलप्रमाणे असतात. डॉक्टर : १० लाख, सरकारी अधिकारी : १५ लाख, सरकारी नोकर : ५ लाख, अभियंता : ३ लाख, परमनंट शिक्षक : ३ लाख अशी पाटील यांनी पोस्ट तयार केली आहे. युवकांमधून ही पोस्ट सर्वाधिक व्हायरल केली
जात आहे.
अ‍ॅड. प्रियांका काटे यांनी सांगितले, की आजही हुंडा घेण्याची मानसिकता प्रत्येक समाजात दिसून येते. हुंडा केवळ पैशातच घेतला जातो, असे नाही. तर पैशांबरोबरच वस्तू, दागिने, वाहन आदींची मागणी वधू कुटुंबीयांकडे केली जाते. मागणी पूर्ण न झाल्यास वधूचा मानसिक, शारीरिक पातळीवर छळ केला जातो. ही वस्तुस्थिती आहे. सुशिक्षित परिवारामध्येदेखील हे प्रकार घडतात. त्यातून विवाहितेच्या आत्महत्येपर्यंत प्रकार घडतात. अनेकदा रीतीरिवाज सांभाळण्यासाठी हुंडा घेतला जातो. वास्तविक विवाह करताना मुलगी तिचे घरदार सोडून पतीकडे येते. तिची हुंडा मागून वस्तूप्रमाणे किंमत करणे
योग्य नाही.
बारामती येथील स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख अंजली वाघमारे म्हणाल्या, की हुंडा मागणी करण्याचे प्रमाण सध्या ७० ते ८० टक्के आहे. केवळ हुंंडा शब्दाचा अर्थ मात्र बदलला आहे. हुंड्याऐवजी घर बांधण्यासाठी पैसे, पतीला व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे, पतीला वाहन घेण्यासाठी पैशांची अनेकदा मागणी केली जाते. मागणी पूर्ण न झाल्यास विवाहितेला मारहाण केली जाते, छळ केला जातो. स्त्री आधार केंद्राकडे तक्रार आल्यानंतर पती-पत्नी दोघांच्या कुटुंबीयांना बोलाविले जाते. दोन्ही कुटुुंबातील सदस्यांबरोबर चर्चा आणि पती-पत्नींचे समुपदेशन याद्वारे संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर कौटुंबिक वाद संपुष्टात येतो. मात्र, वाद न सुटल्यास कायदेशीर मार्गाने हा प्रश्न सोडविण्याचा सल्ला दिला जातो, असे वाघमारे म्हणाल्या.
सर्वधर्मीय वधू-वर सूचक मंडळाचे समन्वयक मंगेश इंगळे यांनी सांगितले, की मंडळाच्या वतीने नातेसंबंध जुळविण्याचा आमचा प्रयत्न असतो. आजची तरुण पिढी उच्चशिक्षित होण्यासाठी प्राधान्य देते. चांगले करिअर घडविताना मुला-मुलींचे विवाहाचे वय ओलांडून जाते. त्यातून विवाह करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मुलामुलींचे वय वाढले आहे. त्यामुळे ऐच्छिक स्थळ मिळत नाही. त्यासाठी वधू-वर सूचक मंडळाची मदत घेतली जाते. हुंडा घेण्यापेक्षा मुला-मुलींनी त्यांचे आयुष्य चांगल्या पद्धतीने जगावे, अशी मानसिकता असणाऱ्या पालकांची संख्या अधिक आहे, असे इंगळे यांनी सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांनीदेखील याबाबत सातत्याने जनजागृती केली जाते. ज्या पद्धतीने छेडछाडीच्याविरोधात पोलीस कार्यरत असतात. महाविद्यायलीन तरुणींना मार्गदर्शन करतात. त्याच पद्धतीने नवविवाहितांचादेखील छळामुळे जीव जाऊ नये, यासाठी त्या मुलीच्या पालकांनी पुढे येण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.

हुंड्यासाठी छळ : सामाजिक संकट

बारामती शहर पोलीस ठाण्यात मागील वर्षी महिलांच्यासंदर्भात २४ गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये हुंड्यासाठी छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या २ नवविवाहित महिलांनी आत्महत्या केल्या, तर दोघींनी छळाला कंटाळून पोलिसांत फिर्याद दाखल केली. २०१७ मध्ये ५ महिन्यांतच छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या ३ विवाहित आहेत, तर ११ महिलांनी सासरच्या छळाला कंटाळून फिर्याद दाखल केली. ही एका पोलीस ठाण्याची आकडेवारी आहे. त्यामुळेच याची तीव्रता एक सामाजिक संकट म्हणून पुढे येत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Dowry continues to be 'dowry'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.