नातवाच्या मृत्यूप्रकरणी आजीवर खुनाचा गुन्हा
By admin | Published: July 16, 2016 03:16 AM2016-07-16T03:16:25+5:302016-07-16T03:16:25+5:30
तीन महिन्यांच्या बाळाला ओढाताण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगत त्याच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात बाळाच्या मृत्यूला आजी
वर्धा : तीन महिन्यांच्या बाळाला ओढाताण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगत त्याच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात बाळाच्या मृत्यूला आजी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्याने कौशल्या पितके (६५, रा. रसुलाबाद) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रसुलाबाद येथील चंद्रकांत पितके यांचा तीन महिन्यांचा मुलगा सौरभ याचा १५ जून २०१६ रोजी पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी बाळाच्या आईच्या तक्रारीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. वैद्यकीय अहवालानुसार ओढाताण केल्यामुळे बाळाच्या फुफ्फुसाला जखम झाली. त्यामुळे त्याच्या छातीत रक्त गोठल्याने त्याला श्वास घेण्यात त्रास होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमुद करण्यात आले आहे.
पोलिसांनी तपास केला असता कौशल्या पितके यांच्याकडे बाळ असताना ओढाताण केल्यामुळे त्याच्या फुफ्फुसाला जखम झाल्याचा आरोप मुलाच्या आईने केला. त्यावरून पोलिसांनी कौशल्या पितके यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)