नांदेड येथे हुंडा प्रकरणातून भावाची आत्महत्या
By admin | Published: January 22, 2016 03:27 AM2016-01-22T03:27:47+5:302016-01-22T03:27:47+5:30
साखरपुडा झाल्यानंतर हुंड्याची रक्कम वाढविण्याच्या कारणावरून बहिणीची सोयरीक मोडल्याच्या नैराश्यातून भावाने मंगळवारी आत्महत्या केली.
नांदेड : साखरपुडा झाल्यानंतर हुंड्याची रक्कम वाढविण्याच्या कारणावरून बहिणीची सोयरीक मोडल्याच्या नैराश्यातून भावाने मंगळवारी आत्महत्या केली. या प्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी हुंडा मागणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डोल्हारी (ता. हिमायतनगर) येथील सतीश माधव कदम (३०) याच्या बहिणीची सोयरीक गत वर्षी पंजाबराव भुजंगराव जाधव (रा. सिरपल्ली, ता. हिमायतनगर) यांचा मुलगा गोपीनाथ याच्याशी ठरली होती. ३ लाख ५१ हजार रुपये हुंडा ठरल्यानंतर साखरपुडा व शाल, अंगठीचा कार्यक्रमही पार पडला. साखरपुड्यानंतर हुंड्याची रक्कम आणखी २ लाखांनी वाढविण्यासंदर्भात मुलाच्या कुटुंबीयांकडून मागणी करण्यात आली. ‘रक्कम वाढवून न दिल्यास लग्न मोडले समजा,’ असेही सांगण्यात आले. त्यामुळे नैराश्य आलेल्या सतीशने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
या प्रकरणात जाधव परिवारातील पंजाबराव (मुलाचे वडील), गोपीनाथ (मुलगा) व रमेश भुजंगराव जाधव, भुजंगराव जाधव या चौघांविरुद्ध मंगळवारी रात्री उशिरा हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलीस पथक रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. (वार्ताहर)