आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 08:14 IST2025-04-23T08:13:51+5:302025-04-23T08:14:28+5:30

बालपणापासूनच अजय यांची सहावी ते बारावीपर्यंत अजयने प्रथम क्रमांक कधी सोडला नाही

Dr Ajay Doke First youth from tribal area to crack UPSC exam; studied through videos on internet | आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

हुसेन मेमन 

जव्हार : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या जव्हार तालुक्यातील पहिले कोगदे या गावातील डॉ. अजय काशीराम डोके यांनी यूपीएससी परीक्षेत ३६४ वा रैंक मिळविला आहे. आदिवासी भागातून यूपीएससी परीक्षेत यश मिळवणारे डॉ. अजय डोके हे पहिलेच युवक ठरले आहेत. विशेष म्हणजे इंटरनेटवरील व्हिडीओच्या माध्यमातून अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले. मोबाइलचा योग्य कामासाठी वापर करून अशा परीक्षांत यश मिळवावे, असा सल्ला डॉ. अजय यांनी दिला.

डॉ. अजय यांच्या या यशात वडील काशीराम व त्यांच्या कुटुंबाचा वाटा आहे. बालपणापासूनच अजय यांची सहावी ते बारावीपर्यंत अजयने प्रथम क्रमांक कधी सोडला नाही. पुढे बारावी विज्ञान शाखेत यश मिळवून के.ई.एम. वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथून एमबीबीएससाठी प्रवेश घेऊन त्यांनी पदवी संपादन केली.

यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्यांना एवढेच सांगू इच्छितो की, आज कोणत्याही प्रकारचे क्लास न लावताही केवळ इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास करू शकतो. आपल्या ग्रामीण भागातील मुलांनीही मोबाइल, लॅपटॉपचा योग्य वापर केला, तर कमी खर्चात गरीब मुलांनाही यूपीएससी पास होणे अशक्य नाही -  डॉ. अजय डोके, जव्हार

मुलुंडची अंकिता पाटील ३०३ व्या क्रमांकावर

यूपीएससी परीक्षेत मुलुंडच्या अंकिता पाटील हिने ३०३ वा क्रमांक मिळवला आहे. मेहनत, सातत्य, सुनियोजन या बळावर अंकिताने हे यश मिळवल्याचे सांगितले. प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांची ती कन्या आहे. अंकिता महाराष्ट्रातून दुसरी आली आहे. तिने प्रथम आयएएसला प्राधान्य दिले आहे. अंकिताचे शालेय शिक्षण हे भांडुप येथील पवार पब्लिक स्कूल येथे झाले. शालेय शिक्षणानंतर तिने अभियांत्रिकी शिक्षण घेतले. त्यानंतर तिने एक वर्षे नोकरी केल्यानंतर तिने यूपीएससीचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. वडील सिव्हिल सर्व्हिसमध्ये असल्याने या क्षेत्रात येण्याची आवड निर्माण झाल्याचे तिने सांगितले. २०२२ मध्ये तिने यूपीएससीची तयारी केली. तिसऱ्या प्रयत्नात तिला यश प्राप्त झाले.

रोज आठ ते दहा तास अभ्यास
रोज आठ ते दहा तास अभ्यास केला. आहाराचे नियम पाळले. मी क्रीडा क्षेत्रातील असल्याने खेळालाही तितकेच महत्त्व दिले. जे वर्तमानपत्र वाचनासाठी निवडले होते तेच शेवटपर्यंत वाचत राहिले. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत मेन्सच्यावेळी प्रवेश घेतला आणि मॉक टेस्ट दिल्या. त्याचप्रमाणे रिव्हिजनवर जास्त भर दिला. वडिलांप्रमाणे आईचादेखील पाठिंबा होता. ती सतत माझ्या पाठीशी होती. मेहनत केली त्याचे चीज झाले, असे अंकिताने सांगितले.

करिअरचे नवे दालन...
मेहनत, सातत्य व सुनियोजित प्रयत्नांतून या परीक्षेत यश मिळवता येते. वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो. पण त्याचबरोबर यूपीएससीची परीक्षा दिली तर करिअरचे नवे दालन उघडू शकते, असे अंकिता म्हणाली. आयएएस अधिकारी होऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याची तिची इच्छा आहे.

Web Title: Dr Ajay Doke First youth from tribal area to crack UPSC exam; studied through videos on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.